आईशी  ‘शब्‍देविना संवादु’

महेंद्र बडदे 
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे - आपली जन्मदाती आई कोण? ती कशी दिसत असेल? तिची आणि माझी भेट होईल का? ती मला ओळखेल का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘त्या’ मायेच्या डोळ्यांत तिला मिळाली. अठ्ठावीस वर्षांपूर्वी बेल्जियम या देशात दत्तक दिलेली अनुष्का आईला भेटली. अंथरुणावर असलेल्या आईच्या हातात बांगडी घालून पाणावलेल्या डोळ्यांनी आठवणी सोबत घेऊन ती पुन्हा बेल्जियमकडे रवाना झाली.

पुणे - आपली जन्मदाती आई कोण? ती कशी दिसत असेल? तिची आणि माझी भेट होईल का? ती मला ओळखेल का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘त्या’ मायेच्या डोळ्यांत तिला मिळाली. अठ्ठावीस वर्षांपूर्वी बेल्जियम या देशात दत्तक दिलेली अनुष्का आईला भेटली. अंथरुणावर असलेल्या आईच्या हातात बांगडी घालून पाणावलेल्या डोळ्यांनी आठवणी सोबत घेऊन ती पुन्हा बेल्जियमकडे रवाना झाली.

भारतातून परदेशात दत्तक म्हणून पाठविलेल्यांना आपले जन्मदाते कोण? यासारखे अनेक प्रश्‍न पडतात. त्यापैकीच अनुष्का ही एक. विदर्भातील एका छोट्या गावात तिचा जन्म झाला. चौदाव्या महिन्यातच तिला एका बेल्जियम दांपत्याने दत्तक घेतले. तेव्हापासून ती तिकडेच होती. या दांपत्याने केरळमधून एक मुलगाही दत्तक घेतला होता. जसे वय वाढत गेले, तसे आई-वडील (दत्तक) आणि आपला रंग, केस अशा सर्वच गोष्टी भिन्न असल्याचे तिच्या लक्षात येऊ लागले. वस्तुस्थिती समजल्यानंतर तिला आपली खरी आई कोण? हा प्रश्‍न भेडसावत होता. आईला भेटण्याची तिची आसही कायम होती. शिक्षण पूर्ण झालेली अनुष्का एका कंपनीत मानवी संसाधन (एचआर) विभागात काम करते. तिचा पती बेल्जियमचा नागरिक असून, तो एका आयटी कंपनीत नोकरी करत आहे. तेथे त्यांचे जीवनही सुरळीत चालू आहे; पण आपण मूळचे कोठून आलो? हा प्रश्‍न तिला शांत बसू देत नव्हता. चित्रकला, कविता रचना आणि संगीत हे तिचे छंद होतेच; पण प्रत्येक क्षणाला ‘जन्मदाती आई’ हा विषय तिच्या मनात असे.

दरम्यान, जोपर्यंत जन्मदाती आईला भेटत नाही, तोपर्यंत आपण चांगली आई होऊ शकणार नाही, असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने आई होण्याचा विचार केला नाही. त्यानंतर तिने बेल्जियम सरकारच्या मदतीने आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तिला यश आले नाही. यासंदर्भात भारतात काम करणाऱ्या ‘ॲक्‍ट’ या संस्थेशी अनुष्काचा संपर्क आला. जन्मदाते शोधून काढण्याच्या कामात तिला अनिल ढोल आणि अंजली पवार यांनी मदत केली. विदर्भातील एका छोट्या गावात तिची आई असल्याची माहिती मिळाली. त्या आईची भेट घेऊन तिला कल्पना देण्यात आली. ‘डीएनए’ टेस्ट आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. अनुष्का भारतात आली आणि विदर्भातील त्या छोट्या गावात ती आईला भेटली. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे तिला आईच्या डोळ्यांतच मिळाली.  

आपण सोडून दिल्याचा राग मुलीच्या मनात असेल, अशी भीती त्या आईच्या मनात होती; पण मुलीच्या हाताच्या स्पर्शाने आईच्या मायेचा बांध फुटला. काही दिवसांपूर्वी पडल्याने अनुष्काची आई अंथरुणावर आहे. उपचार सुरू असून, ती उठून बसू शकत नाही. दोघींच्या संवादात भाषेची अडचण होती; पण डोळे आणि स्पर्शातूनच त्यांना एकमेकींचे मनातील भाव समजत होते. दोन वेळा ती आईला भेटली. अनुष्काच्या मनातील सर्व कोडी सुटली. आईच्या हातात स्वत:च्या हातातील एक बांगडी आठवण म्हणून घातली अन्‌ ती बेल्जियमला रवाना झाली.

Web Title: anushka meet after 28 year