रिक्षा चालवून ‘ती’ हाकते संसाराचा गाडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

माझा आलोक हा सातवीत; तर कृष्णा चौथीत आहे. या दोन्ही मुलांना खूप शिकवायचे आहे; पण त्यांच्या शिक्षणावर मी पैसा खर्च करू शकत नाही. माझ्यावर आज जे दिवस आले आहेत ते माझ्या दोन्ही मुलांवर येऊ नयेत, यासाठी मी माझ्या परीने करीत आहे.
- अनिता पारपल्ली

संकटाच्या वादळातूनही ऑटोच्या मदतीने काढला मार्ग

औरंगाबाद - संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती आणि पत्नी ही दोन चाके फार महत्त्वाची असतात; पण यातील एक जरी चाक गळाले तर संसार उघड्यावर येतो, अशीच काही परिस्थिती शहरातील अनिता पारपल्ली या महिलेवर आली; पण त्या खचल्या नाहीत. रिक्षा चालवून त्यांनी आपल्या मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा रुळावर आणला आहे.

अनिता यांच्या माहेरची परिस्थिती बेताचीच. तळहातावर पोट. आपल्या दमलेल्या आई-वडिलांना मदत म्हणून त्यांनी लग्नापूर्वीच वर्ष १९९० मध्ये रिक्षा चालवायला सुरवात केली. मुलगी रिक्षा चालवते म्हणून येणारे-जाणारे त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत. त्यातील काही नजरा बोचऱ्या, तर काही प्रोत्साहन देणाऱ्या होत्या. अशातच त्यांचे राजू यांच्याशी लग्न झाले. पती मजुरी करीत होता. लग्नानंतर अनिता यांनी रिक्षा चालविणे बंद केले.

इतरांच्या घरी त्या धुणी-भांडी करायला लागल्या. आर्थिक अडचणी होत्याच; पण तरीही त्यांचा संसार सुखात होता. अशातच त्यांच्या संसारवेलीला दोन फुलेही लागली. सगळे सुरळीत होते; मात्र नियतीच्या भांड्यात वेगळेच रसायन शिजत होते. दहा वर्षांपूर्वी अचानक अनिता यांच्या पतीचे निधन झाले. दुःखासह संकाटाचेही आभाळ कोसळले. काय करावे, कसे करावे, मुलांना कसे जगवावे, असे एक ना अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे होते; पण त्या खचल्या नाहीत. या संकाटाच्या वादळातूनही त्यांनी रिक्षाचे स्टिअरिंग पकडून मार्ग काढला. मराठवाड्यातील पहिली रिक्षाचालक महिला म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. 

स्वतःची रिक्षा नाही
याही व्यवसायात खूप स्पर्धा आहे. शिवाय महिला रिक्षा चालवते म्हणून अनेकजण अनिता यांच्या रिक्षात बसत नाहीत. त्यामुळे अनिता यांना अल्प मिळकत मिळते. त्यातून रोज रिक्षाचे १५० रुपये भाडे द्यावे लागते. उरलेल्या पैशातून त्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांना स्वतःची रिक्षा घ्यायची आहे; पण बॅंक लोन द्यायला तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.