अर्ध्या तासात टॉयलेट उभारा, बिनधास्त वापरा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

औरंगाबादेत तयार झाले लोकोमोटिव्ह स्वच्छतागृह

औरंगाबाद - स्वच्छतागृह उभारण्याची किट-किट आता संपली; कारण एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेता येणारे (लोकोमोटिव्ह) आणि बहू उपयोगी असलेल्या ‘सुलभा’ टॉयलेटची निर्मिती शहरातील श्रेया सिस्टीम्स या उद्योगाने केली आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट केवळ अर्ध्या तासात उभारून वापरता येणार आहे.

औरंगाबादेत तयार झाले लोकोमोटिव्ह स्वच्छतागृह

औरंगाबाद - स्वच्छतागृह उभारण्याची किट-किट आता संपली; कारण एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेता येणारे (लोकोमोटिव्ह) आणि बहू उपयोगी असलेल्या ‘सुलभा’ टॉयलेटची निर्मिती शहरातील श्रेया सिस्टीम्स या उद्योगाने केली आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट केवळ अर्ध्या तासात उभारून वापरता येणार आहे.

ग्रामीण भाग असो वा शहर, टॉयलेट उभारण्यासाठी लागणारी सामग्री जमा करणे, त्यासाठीचे गवंडी, मजूर, प्लंबर, गोळा करण्यासाठी कसरत करावी लागते; मात्र ही दमछाक चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील श्रेया सिस्टीमने संपुष्टात आणली आहे. अवघ्या अर्ध्या तासात कुठेही फिट होऊन वापरासाठी सज्ज होणारे काँक्रिटच्या बनावटीचे टॉयलेटची निर्मिती या कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे कुठेही जॉईंट नसलेल्या या टॉयलेटमध्ये शॉवर आणि इन्बिल्ट प्लंबिंग सर्किट तयार असल्याने याला भारतीय आणि पाश्‍चिमात्य पद्धतीनेही तयार केले जाते. शॉवर असल्याने याचा वापर हा स्नानासाठीही केला जाऊ शकतो. सुमारे दीड टन वजनी असलेल्या या टॉयलेटला क्रेनच्या साहाय्याने बसवता आणि हलवता येते.

केवळ टाकी फिट करून या टॉयलेटचा वापर लगेच केला जाऊ शकतो. एक मीटर लांबी आणि तेवढीच रुंदी असलेल्या या स्वच्छता गृहाची घरपोच आणि बसवण्यासहित किंमत २५ हजारांपर्यंत असल्याची माहिती कंपनीचे संचालक भगवंत ग्रामले यांनी सोमवारी (ता.१४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   

पुढील टप्पा बायोगॅस तयारीचा 
स्वच्छतागृह वापरणाऱ्या सर्वसामान्य अशा चार माणसांच्या कुटुंबात दिवसाकाठी सात माणसांच्या मलनिस्सारणातून बायोगॅस तयार करण्याचा या कंपनीचा प्रयत्न राहणार आहे. या टॉयलेच्या साथीने गॅस निर्मितीचे मॉडेल विकसित करण्यात येणार आहे ज्यामुळे घरगुती वापरासाठीचा गॅस हा घरातच उपलब्ध होईल आणि एलपीजी खरेदीचा खर्च वाचण्यास मदत होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

एकाच टॉयलेट युनिटमध्ये विविध सुविधा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सहा जणांचा चमू यावर काम करीत होता. या ‘सुलभा’ टॉयलेटमध्ये पाण्याचा खप कमी करणारी यंत्रणा आहे. सिमेंट -वाळूच्या सहाय्याने या सुविधांचे टॉयलेट उभारणीचा खर्च ५० हजारांपर्यंत जातो. हलवणे आणि लावणे सोपे असल्याने हे टॉयलेट शहर आणि ग्रामीण भागासाठी फायद्याचे ठरेल. 
- भगवंत ग्रामले, संचालक, श्रेया सिस्टीम्स