शर्थीच्या प्रयत्नानंतर बाळासह आई सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - अत्यंत चिंताजनक परिस्थितीत असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार करून घाटीतील डॉक्‍टरांनी तिची सीझर तंत्रज्ञानाने प्रसूती केली. वाढलेला रक्तदाब, त्यातच दोन झटके आल्याने, बाळ आणि आई दोघांचाही जीव वाचवणे हे डॉक्‍टरांपुढे मोठे आव्हान होते. परंतु शर्थीने प्रयत्न करून घाटीतील डॉक्‍टरांनी दोनही जीव वाचविले. 

औरंगाबाद - अत्यंत चिंताजनक परिस्थितीत असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार करून घाटीतील डॉक्‍टरांनी तिची सीझर तंत्रज्ञानाने प्रसूती केली. वाढलेला रक्तदाब, त्यातच दोन झटके आल्याने, बाळ आणि आई दोघांचाही जीव वाचवणे हे डॉक्‍टरांपुढे मोठे आव्हान होते. परंतु शर्थीने प्रयत्न करून घाटीतील डॉक्‍टरांनी दोनही जीव वाचविले. 

चोवीस वर्षीय आरती जैन (रा. नेरी, ता. जामनेर, जि. जळगाव) या आठ महिन्यांच्या गर्भवतीस ३१ ऑक्‍टोबरला रक्तदाब व अन्य त्रास सुरू झाला. डॉक्‍टरांनी त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्याचे सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची सूचनाही घाटी रुग्णालयाला देण्यात आली. त्यानुसार डॉक्‍टरांची टीम आणि यंत्रणा कामाला लागली. आरती जैन यांना रात्री पाऊणे नऊला घाटीत नेण्यात आले. त्यांना झटके आल्याने त्याचा प्रभाव त्यांच्या मेंदूवर होऊन सुज आली होती. त्यानंतर अन्य व्याधींचा त्रास सुरू झाला.

प्रकृती चिंताजनक होऊन, रक्तदाब वाढला. अशा स्थितीत सुलभ प्रसूती शक्‍य नसल्याने डॉक्‍टरांनी सीझर करण्याचा निर्णय घेतला; पण हीसुद्धा जोखीमच होती. डॉ. भट्टाचार्य यांनी त्यांची तपासणी केली, यानंतर वरिष्ठ प्रसूतितज्ज्ञ श्रीनिवास गडप्पा, सहायक प्राध्यापक ऋषिकेश मानधने यांनी गर्भवतीचे सीझर केले. यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. विरशिद हजर    होत्या. 
प्रसूतीनंतर आरती जैन यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लीना इंगळे, रोहिणी दातार यांनी त्यांची काळजी घेतली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचीही यावेळी मोठी मदत झाली.

प्रसूती विभागाला हवे व्हेंटिलेटर
जैन यांच्यासारख्याच बहुतांश रुग्णांना वेळीच मदत मिळावी म्हणून व्हेंटिलेटरची गरज आहे; परंतु प्रसूती विभागाला व्हेंटिलेटरच नाही. शासनाकडून प्रसूतिगृहाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्यास अनेक गर्भवतींचा जीव वाचू शकेल.

मुलीची प्रकृती उत्तम
डॉक्‍टरांच्या प्रयत्नांमुळे आरती जैन यांचा जीव वाचला. विशेषत: मुलगी झाल्याचा आनंदही त्यांना झाला. मुलीच्या प्रकृतीकडे डॉ. अतुल लोंढे लक्ष देत असून, जन्मावेळी एक किलो तीनशे ग्रॅम वजन असून, प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती; परंतु रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून जोखमीने प्रयत्न करून आमच्या टीमने प्रसूती केली. प्रसूतीनंतरही बाळाचे वजन कमीच होते, वाढही खुटली होती. पण आता सुयोग्य उपचारामुळे बाळ व बाळंतीण तंदुरुस्त आहे. 
 - डॉ. श्रीनिवास गडप्पा, वरिष्ठ प्रसूतितज्ज्ञ.