आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळाला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

शासकीय मदतीचा धनादेशही मिळाला, ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश

औसा - तालुक्‍यातील समदर्गा येथील शेतकरी शंकर गिराम यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही दुर्धर आजाराने निधन झाले होते. ‘आई आणि वडिलांच्या निधनाने उघड्यावर आली मुले’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने या कुटुंबाची व्यथा मांडली होती. त्याचा परिणाम म्हणून या कुटुंबाला शासकीय मदतीचा धनादेश तर मिळालाच; परंतु या कुटुंबाच्या एक महिन्याच्या रेशनची व्यवस्थाही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

समदर्गा (ता. औसा) येथील शेतकरी शंकर गिराम व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांची तीन मुले उघड्यावर आली होती. त्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज आणि आई-बाप नसल्याच्या भावनेने ही मुले भयभीत झाली होती. पहिल्यांदा ‘सकाळ’ने या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जगासमोर आणल्या. येथील तहसीलदार अहिल्या गाठाळ आणि उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी शासकीय मदतीसाठी सकारात्मक प्रयत्न केले. परवाच त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. औशाचे भूमिपुत्र पण सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले ऋषिकेष पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेऊन आगामी दसरा आणि दिवाळी या कुटुंबाला गोड व्हावी, यासाठी पुणे येथील मित्रांच्या साहाय्याने गिराम कुटुंबाला आधार दिला. तीन ते चार महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि रेशनचा पुरवठा या कुटुंबाला त्यांनी केला. ही मदत घेताना या कुटुंबाने ‘सकाळ’च्या प्रतिनिधींशी फोनवर संपर्क साधून ‘सकाळ’चे आभार मानले. 

या वेळी औसा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मिटकरी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ इळेकर, प्रा. युवराज हालकुडे, संतोष देशपांडे, मदत करणारे ऋषिकेष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.