...आणि तिच्या अंगावर आली खाकी वर्दी

ज्ञानेश्वर रायते
शनिवार, 10 जून 2017

चांगुणा पाथरकर हिच्या जिद्दीची कथा; पुणे लोहमार्ग पोलिस भरतीत उत्तीर्ण

बारामती - दारिद्य्राची सोबत अगदी लहानपणापासून जणू पाचवीलाच पुजलेली. आई-वडील दोघेही मजुरी करतात. सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. पतीचीही घरची स्थिती अगदी हलाखीची. आईवडिलांनी मात्र खस्ता खाऊन बारावीपर्यंत शिकविले. त्याचा काहीतरी उपयोग करायचा हे तिने मनोमन ठरवले होते. तिच्या जिद्दीला सुनंदा पवार यांनी आर्थिक, शैक्षणिक पाठबळ दिले आणि मग मात्र पोलिस व्हायच्या जिद्दीने ती धावत राहिली. पुणे लोहमार्ग पोलिसाच्या भरतीत उत्तीर्ण झालेल्या चांगुणा अण्णा पाथरकर हिच्या अंगावर आता खाकी वर्दी येणार आहे.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा स्पोर्ट ॲकॅडमीमध्ये मोफत पोलिस प्रशिक्षण घेऊन चांगुणा नुकतीच यशस्वी झाली. आईवडील काही शिकलेले नव्हते. पतीचेही आठवीपर्यंत शिक्षण झाले असून पती शिवणकाम करतात. मात्र या सर्वांनी खूप मोठे पाठबळ उभे केले. तिच्या जगण्याच्या लढाईला घरच्यांनी आणि सासरच्यांनी स्वातंत्र्य दिले. मूळची खांडज येथील चांगुणा हिचे सासर फलटण तालुक्‍यात ताथवडे येथे आहे. माहेरी व सासरीही कष्टाचीच परंपरा राहिल्याने ती अस्वस्थ होती. तिला मुलगी  झाल्यानंतर तर चूल आणि मुलीतच ती गुंतून गेली. मात्र मागील वर्षी माहेरी आल्यानंतर खांडज गावातील तीन मैत्रिणी पोलिस भरती झाल्या, त्यांनी शारदानगरमध्ये मोफत प्रशिक्षण घेतले अशी माहिती मिळाली व तिने लगेच सुनंदा पवार यांची भेट घेऊन माझे आयुष्य मला बदलायचे आहे असे मत व्यक्त केले. तिची जिद्द पाहून पवार यांनी तिला ॲकॅडमीत सहभागी करून घेतले व त्याच दिवसापासून तिच्या प्रशिक्षणास सुरवात झाली. 

गुरुवारी चांगुणा तिच्या पती व आईवडिलांसह ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांना भेटली घेतली व त्यांचे आभार मानले.