मोबाईलची बॅटरी चार्ज होताच पिन पडेल बाहेर

bankar- doke
bankar- doke

पिंपरी - मोबाईल ‘चार्जिंग’ हे जीवनातील महत्त्वपूर्ण काम बनले आहे. पण वारंवार अतिरिक्त चार्ज झाल्याने बॅटरीची क्षमता कमी (ड्रेन) होण्याची शक्‍यता वाढते. कधी कधी नवीन बॅटरी व कधी नवीन चार्जर खरेदी करावा लागतो. त्यामुळे अनावश्‍यक खर्च वाढतो. या पार्श्‍वभूमीवर अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘रिमूव्हेबल चार्जिंग मेकॅनिझम’ हे उपकरण तयार केले आहे.

अभिजित बनकर व श्रीरंग डोके अशी त्यांची नावे आहेत. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी हे उपकरण बनविले आहे. जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबातील ते दोघे असून अनुक्रमे ते डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग (तळेगाव) आणि पीडीईएज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (हडपसर) महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. 

मोबाईल चार्जिंगसंदर्भात दररोज भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे उपकरण बनविण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना अल्पावधीतच यशही आले. ‘नॉव्हेल्टी फीचर’चा वापर हे या उपकरणाचे वैशिष्ट्य आहे. बॅटरी शंभर टक्के चार्ज झाल्यानंतर चार्जरची पिन आपसूक बाहेर फेकली जाईल, ही त्यामागील मूळ संकल्पना आहे. विशेषतः हे उपकरण बॅटरीयुक्त कोणत्याही वस्तूमध्ये वापरण्याजोगे आहे. सध्यस्थितीला त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये वापरता येईल, असे छोटेखानी ‘वर्किंग मॉडेल’ तयार केले आहे. त्याहीपेक्षा कमी आकारातील ‘मॉडेल’ बनविण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न आहे. एवढेच नव्हे, तर ‘स्विचिंग ॲप्लिकेशन’साठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

कोणाच्याही मार्गदर्शन व मदतीशिवाय त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यासाठी त्यांना ५० हजार रुपये इतका खर्च आला आहे. महाविद्यालयाच्या वेळा व अभ्यासाची योग्यरीत्या सांगड घालून केलेल्या उपकरणासाठी त्यांनी ‘पेटंट’चे रजिस्ट्रेशन केले आहे. त्याव्यतिरिक्तही त्यांचे विविध प्रयोग सुरू असून, दैनंदिन अडचणी सोडविणारी उपकरणे बनविण्याचा त्यांचा मानस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com