पहिल्या टॅबयुक्त शाळेचा मान भैरेवाडीला!

- जालिंदर सत्रे
शनिवार, 4 मार्च 2017

पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. 

पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. 

तारळे विभागातील ढोरोशीच्या दक्षिणेला सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले भैरेवाडी साधारण दीडशे ते १८० लोकसंख्येचे गाव. खरीप हंगामातील भात पीक सोडले तर कोणतेही साधन नसल्याने उंब्रज परिसरात वीटभट्टीवर अनेक कुटुंबे मोलमजुरीसाठी जातात. बहुतांशी पुरुष मंडळी मुंबई-पुण्यासारख्या शहरात रंगकामात अशी एकूण परिस्थिती. दोन शिक्षकी शाळा असणाऱ्या या गावात सांगली जिल्ह्यातील विजय लिगाडे हे मुख्याध्यापक म्हणून पाच वर्षांपासून तर उस्मानाबादचे दादाराव सावंत सहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. डोंगरातील शाळा मिळाली म्हणून रडत न बसता राज्याचे तंत्रस्नेही व म्हसवड नंबर-एक शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांच्यापासून प्रेरणा घेऊन अठराविश्‍व दारिद्य्र असणाऱ्या गावकऱ्यांना प्रेरित केले. १५ ऑगस्टपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गावच्या यात्रेतील करमणुकीच्या तमाशा अथवा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द करून शाळेतील विद्यार्थी व माध्यमिकला जाणाऱ्या गावच्या मुलांना बरोबर घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली. त्यातून सात हजारचे बक्षीस मिळाले व दुसऱ्या दिवशी मदतीचा ओघ सुरू झाला. मोलमजुरी करणारे कुटुंबप्रमुख न मागता हजार-दोन हजारांची मदत करू लागले. 

काही कमी पडतेय असे लक्षात येताच जिद्दी शिक्षकांनी त्यापुढे जाऊन ढोरोशीचे सुपुत्र व राज्याचे शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर यांच्याकडे मदतीसाठी हात पुढे केला. अखेर ७० हजारांचा निधी जमा झाला व १२ टॅबच्या माध्यमातून १२ पटसंख्या असली तरी भैरेवाडी शाळेने सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त शाळा होण्याचा मान मिळवला.

गटशिक्षणाधिकारी आर. पी. निकम, विस्तार अधिकारी पी. जी. मठपती, गावचे सुपुत्र व जळव केंद्राचे केंद्रप्रमुख आर. पी. गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापक विजय लिगाडे यांनी सांगितले. 

शैक्षणिक क्रांतीमुळे जिल्ह्यातील सधन गावांच्या डोळ्यात घातले अंजन  
लोकसहभागातून शैक्षणिक उठावात ग्रामस्थ व शिक्षक चांगले योगदान देत आहेत. इंग्रजी शाळांचे आक्रमण असताना पाटणसारख्या डोंगरी तालुक्‍यात डिजिटल क्‍लासरूम व जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त शाळा होतेय, हे मी माझे भाग्य समजतो. लोकसहभाग असाच राहिला, तर जिल्हा परिषद शाळांचे रुपडे लवकर पालटेल.
-आर. पी. निकम, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पाटण.