शेतकऱ्यांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तळमळ 

अंकुश गुंडावार
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचा काळ विश्रांतीचा समजला जातो. काहीजण मुले व नातवंडांसह वेळ घालविण्याचे प्लानिंग करतात. काही निवृत्तीनंतरही काम करतात. परंतु, सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन व वेळ शेतकऱ्यांसाठी खर्च करणारा अधिकारी आहे. शेतकऱ्यांच्या भल्ल्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे. 

नागपूर : अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचा काळ विश्रांतीचा समजला जातो. काहीजण मुले व नातवंडांसह वेळ घालविण्याचे प्लानिंग करतात. काही निवृत्तीनंतरही काम करतात. परंतु, सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन व वेळ शेतकऱ्यांसाठी खर्च करणारा अधिकारी आहे. शेतकऱ्यांच्या भल्ल्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे. 

मंगेश देशमुख (रा. अमरावती) असे अधिकाऱ्याचे नाव आहे. देशमुख कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पातून प्रकल्प संचालक म्हणून दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांना जवळपास 50 हजारांची पेन्शन मिळणार होती. त्यांनी शासनाला पत्र देऊन निवृत्तीनंतर काही काम देण्याची विनंती केली. मात्र, शासनाकडून उत्तर न मिळाल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचे ठरविले. यातूनच स्मार्ट आत्मा प्रकल्पाचा जन्म झाला. 

कृषी, पशुसंवर्धन, माती परीक्षक, समुपदेशक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना त्यांनी यात जोडले. यानंतर पेन्शनची रक्कम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, झीरो बजेट शेती व लागवड खर्च कसा कमी करायचा या विषयी गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनावर खर्च केली. शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा विचार मनात येऊ देऊ नका, परिस्थितीशी संघर्ष करा, स्वत:च्या ज्ञानाच्या मदतीने शेतीत नवीन प्रयोग करा, असा मूलमंत्र ते देत आहेत. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यापासून सुरू केलेले त्याचे कार्य स्मार्ट आत्माच्या माध्यमातून नागपूरपर्यंत पोहोचले आहे. देशमुख यांची तळमळ पाहता इतरही सेवानिवृत्त अधिकारी व काही स्वयंसेवक त्यांच्या कार्याशी जुळत आहेत. त्यामुळेच दोन वर्षांच्या अल्प कालावधीत स्मार्ट आत्माने काही यशस्वी प्रयोग केले. 

गोमुत्रापासून कीड, बुरशीनाशक 
स्मार्ट आत्मा प्रकल्पातील तज्ज्ञांच्या मदतीने गोमुत्रापासून कीड व बुरशीनाशक तयार केले. त्याचे परिणामदेखील चांगले दिसून आले. एवढेच नव्हे, तर गोमुत्रापासून एक अर्क तयार केले असून, ते 108 प्रकारच्या आजारांवर चालत असल्याचा दावा या प्रकल्पाचे समन्वयक प्रा. गंगाधर नाखले यांनी केला आहे.