कष्टातून घातली स्वप्नभूमीला गवसणी...

कष्टातून घातली स्वप्नभूमीला गवसणी...

धुळे - घरात अठरा विश्‍वे दारिद्र्य...भूमिहीन शेतमजुराच्या घरातील सात बहिणींचा एकुलता भाऊ...खर्च पेलवणार नाही म्हणून शिक्षणाला तिलांजली देत मजुरी करणाऱ्या बहिणी, आईवडील त्याला शिक्षणासाठी पैसा कमी पडू देत नाहीत...या स्थितीची तो जाणीव ठेवत मास्टर ऑफ कॉम्प्युटरची पदवी घेतो आणि वार्षिक ४० लाखांचा पगार सोडून तो आता पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्रातील कंपनीचा मालक तर होतोच; पण अमेरिकेतील जाहिरात क्षेत्रातील कंपनीचा संचालक-सल्लागारही होतो! गरिबीवर मात करत यश गाठणाऱ्या धमाणे (ता. धुळे) येथील गुलाब पाटील (वय ३४) या तरुणाची थक्क करणारी ही प्रेरक कहाणी आहे.

धुळ्यापासून दहा किलोमीटरवर साडेतीन ते चार हजार लोकसंख्येचे धमाणे गाव आहे. तेथे शेतमजूर प्रल्हाद चिंधा पाटील यांचे मातीचे घर. यात सात बहिणींचा एकुलता भाऊ असल्याने गुलाब सर्वांचाच लाडका. आईवडील मजुरीतूनच मुलांचा सांभाळ करत असताना घरात विजेचा पत्ता नव्हता. दिवसभर मजुरी केल्यानंतर त्यांच्या घरातील चूल पेटत होती. तरीही त्यांनी गुलाबने शिकावे व वेगळे काही तरी करून दाखवावे, असे स्वप्न उराशी बाळगले. 

कुटुंबाच्या मेहनतीचे भान
धमाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक, रेवागिरी बाबा विद्यालयात माध्यमिक, धुळ्यातील ‘एसएसव्हीपीएस’ महाविद्यालयात गुलाबने विज्ञान शाखेची पदवी घेतली. १९९९ला दहावीत ७८ टक्के गुण मिळविल्यानंतर ‘डीएड’ करून शिक्षक होतो, असा विचार मांडणाऱ्या गुलाबने इंजिनिअर व्हावे, अशी इच्छा आईवडिलांनी प्रकट केली. परंतु, त्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यानंतर ‘तू फक्त शीक, मी पैशाचे पाहतो’, असे वडील सांगतात. धुळ्यातून गुलाबला घरी येता येऊ नये म्हणून त्याला रोज धमाणेपासून ४० किलोमीटरवर बाभूळवाडी (ता. शिंदखेडा) येथे मजुरीसाठी सायकलवर जाणारे वडील रुमालात बांधलेली चटणी-भाकरी पोचवत होते. त्याचे भान राखणाऱ्या गुलाबने ‘बीएस्सी’ला महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर त्याने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून २००७ ला मास्टर ऑफ कॉम्प्युटरची पदवी मिळविली. 

अमेरिकेपर्यंत यशस्वी झेप
आपल्यासाठी काबाडकष्ट करणारे आईवडील, बहिणींचे पांग फेडावे म्हणून तो नोकरीनिमित्त पुण्यात दाखल झाला. तेथे त्याने एक्‍सटीपीएल, मोबीप्रीमो टेक्‍नॉलॉजी संगणक अभियंता म्हणून कंपनीत काम केले. नंतर बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर तो थेट पबमॅटिक इंडिया कंपनीत संचालक अभियंता पदावर नियुक्त झाला. या माध्यमातून त्याचा आयटी क्षेत्रातील संपर्क वाढला. दहा ते बारा वर्षे नोकरी केल्यानंतर फेब्रुवारी २०१७ ला स्वबळावर बाणेर (पुणे) परिसरात गुलाबने स्वमालकीची ‘लेमा टेक्‍नॉलॉजी’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची जाहिरात क्षेत्रातील कंपनी स्थापन केली. ते मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या या कंपनीत २२ अभियंता, इतर कर्मचारी आहेत. आशिया खंडात अल्पावधीत अग्रणी ठरलेल्या आणि डिजिटल ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात गुलाबने विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण प्रणालीला तीन पेटंटही मिळाली आहेत. अशी यशाकडे घोडदौड करत असताना अमेरिकेतील ‘दी मीडिया स्ट्रीट’ या जाहिरात क्षेत्रातील नामांकित कंपनीने गुलाबची संचालक- सल्लागार पदावर नियुक्ती केली आहे. गुलाबने घरची स्थिती बदलविली तर आहेच, शिवाय बहिणी, भाचे यांना तो आर्थिक पाठबळ देत आहे. 

कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीसाठी...
गुलाब पाटील म्हणाले, ‘‘आईवडील, बहिणींचे पाहिलेले काबाडकष्ट हीच मला यशाकडे नेणारी ऊर्जा ठरली. वार्षिक एक कोटी रुपयांचा पगार मिळू शकत असतानाही केवळ नोकरी करून जगण्यापेक्षा काही तरी वेगळे करून दाखविणे, आईवडिलांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी ध्येयासक्त झालो. संशोधनात रस असल्याने डिजिटल ॲडव्हर्टायझिंगमध्ये नवीन संगणकीय प्रणाली विकसित करून ‘लेमा’ कंपनीला आशिया खंडात नावारूपाला आणले. या पुढे पैशांअभावी इच्छा असूनही शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांसाठी कार्य करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com