मांजरांची भूक शमवणारा अवलिया

दीपक शेलार
मंगळवार, 11 एप्रिल 2017

दिलीप प्रधान खाद्य पुरवून फिरवतात मायेचा हात; मॉर्निंग वॉकबरोबरच देखभाल...  

ठाणे - सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस माणसाला विचारत नाही, तिथे मुक्‍या प्राण्यांची काय कथा; मात्र ठाण्यातील मार्जारप्रेमी वृद्ध सद्‌गृहस्थ पहाटे मॉर्निंग वॉकच्या वेळेत मांजरांच्या हाकेला ‘ओ’ देऊन काही अंशी त्यांच्या पोटाची भूक शमवत आहेत. त्यामुळेच ते आल्याचे समजताच सकाळी ठाण्यातील कचराळी तलाव परिसरात त्यांच्या सभोवती जणू मांजरांचे संमेलन भरल्याचा भास होतो. दिलीप प्रधान असे या अवलियाचे नाव असून त्यांची ही धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी असून दहा वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता आजही कायम आहे.     

चिऊ-काऊसोबतच माऊच्या म्हणजेच वाघाच्या मावशीच्या सान्निध्यात अनेकांचे बालपण सरते; परंतु वृद्धापकाळातही बालपणीच्या आठवणी जपत एक आगळावेगळा छंद नौपाडा, विष्णूनगर येथील  प्रधान यांनी जपला आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाताना आपल्यासोबत मांजरांसाठी खाद्य घेऊन प्रधान सकाळचा व्यायाम करतात. एका बड्या खासगी कंपनीत अभियंतापदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रधान यांच्या मुलीने घरात आणलेल्या गोंडस छोट्या मांजरीच्या पिल्लाचा लळा त्यांना लागला. घरातच नऊ मांजरांचा काफिला वावरू लागल्याने या मांजरांची भूक शमवण्यासाठी त्यांनी कॅट फूड (माशांचा सुवास असलेले परदेशी आयात खाद्य) आणले. त्यानंतर, जेव्हा-जेव्हा ते   मॉर्निंग वॉकसाठी पाचपाखाडी येथील कचराळी तलावावर जात, तेथे अनेक जण माशांसाठी खाद्य पुरवतात, हे पाहून प्रधानांनी कॅट फूड पिशवीतून नेऊन मांजरांना देण्यास सुरुवात केली. या कॅट फूडच्या वासाने सुरुवातीला हे खाद्य खाण्यासाठी येणाऱ्या मांजरांची संख्या एक-दोनवरून नऊ-दहावर पोहोचल्याने कचराळी तलाव परिसरात मांजरांचे संमेलनच भरल्याचे दिसते. आजही त्यांचा हा शिरस्ता कायम असून मांजरे चक्क त्यांचा माग काढत पाठीमागे येतात. अनेकदा मांजरांमध्येच किंवा कुत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे इथे द्वंद्व पेटल्याने कुत्रे-मांजरे जखमी होतात. त्यांच्यावर उपचारदेखील करतो, असे प्रधान सांगतात.

प्रधान यांच्या या परोपकारी वृत्तीचा अडथळा काही मंडळीना होत असल्याने त्यांनी प्रधान यांच्या उपक्रमाला आक्षेप घेतला; तसेच कचराळीचे ‘कॅट पार्क’ केल्याचे टोमणेही मारले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत प्रधान यांनी त्यांचे काम चालूच ठेवले आहे. 

माणसाला जशी भूक लागते तशी प्राण्यांनाही लागते; मात्र प्राण्यांना सांगता येत नाही. रस्त्यावरील भटके कुत्रे व मांजरी उकिरड्यातून अन्न शोधत असतात. तेव्हा त्यांच्यासाठी आपल्या घासातला एक घास देऊन तरुणाईने अन्नदानाचे व्रत जोपासावे.
- दिलीप प्रधान.