डाउनहिल सायकलिंगमधला ‘एकलव्य’

डाउनहिल सायकलिंगमधला ‘एकलव्य’

पुणे - डोंगरमाथ्यावरून वेगाने सायकल चालवत नियोजित अंतर पार करायचे अन्‌ वेगावर नियंत्रण ठेवून बॅलन्स सांभाळायचे हा खेळ जरा अवघडच ! तरीदेखील त्यात प्रावीण्य मिळवून आंतरदेशीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावण्याची किमया ऋग्वेद थिटे या १६ वर्षीय तरुणाने केली आहे. तेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेताच! या खेळाला डाउनहिल सायकलिंग म्हटले जाते. 

नेपाळ येथे १९ मार्च रोजी झालेल्या हिमालयीन आउटडोअर्स फेस्टिव्हलमधील डाउनहिल सायकलिंग स्पर्धेमध्ये ऋग्वेदने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तो सध्या सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत इयत्ता अकरावीत शिकत आहे. या खेळात पुढे जाण्यासोबतच त्याला सनदी लेखापाल क्षेत्रात ‘करिअर’ घडवायचे आहे. लहानपणी मित्रांसोबत यू-ट्युबवर व्हिडिओ बघताना ‘डाउनहिल सायकलिंग’ खेळाबद्दलचे त्याला कुतूहल निर्माण झाले. मित्रांसोबत खेळ ‘ट्राय’ करता करता त्यात आवड निर्माण झाली. ऋग्वेदने स्वत:च सराव सुरू केला.   

 या खेळाबाबत ऋग्वेद म्हणाला, ‘‘ मित्रांसोबत खेळता खेळता मला आवड निर्माण झाली. त्यानंतर आम्हाला या खेळाच्या स्पर्धांबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये सहभाग घेण्याचे मी ठरविले; मात्र या खेळाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था शहरात नसल्याने पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्‍न होता. मग मी, मित्र पीयूष चव्हाण आणि अद्वैत पत्की आम्ही सर्वांनी मिळून स्वत:च तयारी करायची असे ठरवले. त्यानुसार कोथरूड येथील एआरएआय डोंगर येथे कृत्रिम अडथळे निर्माण करून आम्ही सराव केला. यामध्ये माझ्या मित्रांनी मोलाची मदत केली. ठरविल्यानुसार बेंगळूर येथील स्पर्धेमध्ये भाग घेतला तिथे ४ था क्रमांक आला होता. त्यानंतर आंतरदेशीय स्पर्धेत मात्र प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचा मला खूप आनंद होत आहे.’’

नेपाळमधील स्पर्धेच्या अनुभवाबद्दल ऋग्वेद म्हणाला, ‘‘नेपाळमध्ये हा खेळ चांगल्याप्रकारे विकसित झाला आहे. तेथील स्पर्धकही कुशल होते. या खेळातले अनेक बारकावे माहीत असल्यालेल्या खेळाडूंसोबत खेळताना साहजिकच थोडी भीती होतीच; पण मनाची पूर्ण तयारी करून आत्मविश्‍वासाने ट्रॅकवर उतरलो आणि विजय मिळविला. तेथील खेळाडू सराव करत असलेल्या ट्रॅकबद्दल त्यांनी माहिती दिली. या खेळातील अनेक बारकावेही समजावून सांगितले. ’’ 

काय आहे डाउनहिल सायकलिंग?
डाउनहिल सायकलिंग म्हणजे डोंगरमाथ्यावरून कमीत कमी वेळात सायकल चालवून नियोजित अंतर पार करणे. उतारावरून खाली यायचे असल्यामुळे साहजिकच सायकलचा वेग जास्त असतो. त्यातही सरळ खाली न येता विविध कृत्रिम अडथळे आणि वळणे घेत खाली यायचे. या स्पर्धेमध्ये ऋग्वेदने दीड किलोमीटर हे अंतर तीन मिनिटे २० सेकंद इतक्‍या कमी वेळेत पूर्ण केले. यामध्ये खेळाडू सुरक्षेसाठी संपूर्ण चेहरा झाकला जाईल, असे हेल्मेट, आर्मर, गुडघा रक्षक घालतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com