येवल्याचा तरुण स्वकर्तृत्वावर शास्त्रज्ञ

Dr. Santosh Pingale
Dr. Santosh Pingale

येवला - वडील, आई निरक्षर... घरात उच्चशिक्षणाची कोणतेही पार्श्‍वभूमी नाही. मात्र यशाच्या वाटेवर जाण्यासाठी स्थितप्रज्ञ होऊन प्रामाणिक संघर्ष केला की यश आपलेच. स्वतःकडे जिद्द व लढण्याचा बाणा असल्याने बल्हेगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. संतोष पिंगळे यांनी थेट शास्त्रज्ञ या मोठ्या यशाला गवसणी घातली. 

वडील हयात नाहीत, आईला मात्र मुलगा शास्त्रज्ञ झाला या गोष्टीचा अभिमान वाटतो. या पदाबाबत तिला फारसे कळत नाही, तरीपण इतरांना सांगताना तिचा ऊर भरून येतो. माझा मुलगा संशोधक झाला आहे. कुटुंबाला अभिमान वाटावा, असे यश संतोषने मिळवले आहे. त्यांची रुडकी (उत्तराखंड) येथील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जलविद्यान संस्थेच्या जलस्त्रोत मंत्रालयांतर्गत जलसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय संस्थेत शास्त्रज्ञ पदावर नियुक्ती झाली आहे. नुकतेच ते कामावर हजर झाले. त्यामुळे गाव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी पाच वर्षांपासून इथिओपिआ येथे अर्बामिनच विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदावर ते काम करत होते. आता स्वतःच्या देशात शास्त्रज्ञ (क) या पदावर नियुक्ती झाल्याने मायदेशी परतल्याची व देशासाठी काम करण्याची ओढ पूर्ण झाली आहे. 

संतोष यांचा आजपर्यंतचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी असाच आहे. बल्हेगावच्या जिल्हा परिषदेच्या प्रथमिक शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षण स्वामी मुक्तानंद विद्यालयात घेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे बी.टेक. पदवी मिळवली. येथेच उच्चशिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. एवढ्यावरच न थांबता आयआयटीसारख्या संस्थेत संधी मिळवण्यासाठी गेट परीक्षा दिली. यशाने हुलकावणी दिली. पण नाउमेद न होता "आयसीएआर' ही परीक्षा दिली व त्यात राष्ट्रीय पातळीवर बारावी रॅंक आली. त्यामुळे पंत युनिव्हर्सिटी, पंतनगर (उत्तराखंड) येथे प्रवेश मिळाला. एवढ्यावरच न थांबता पुन्हा आयआयटीचा दरवाजा ठोठावला. गुणवत्तेच्या आधारावर पीएच.डी.साठी फेलोशीप मिळाली. या संधीचे सोने करत असताना पीएच.डी.साठी कॅनडा सरकारची कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली व सस्केच्वन युनिव्हर्सिटीत सहा महिने संशोधनाची संधी मिळाली. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकात लेख प्रसिद्ध झाले.

इथिओपियात अध्ययन 
परिस्थितीमुळे नोकरी आवश्‍यक असल्याने इथिओपियात प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. पण मायदेशाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. आयआयटीतच काम करायचे स्वप्न बाळगले होते. परंतु आता केंद्र सरकारच्या सेवेत शास्त्रज्ञ म्हणून संधी मिळाल्याने गगनात न मावणारा आनंद झाल्याचे संतोष सांगतात. या सर्व काळात प्रचंड मेहनत, सहकाऱ्यांचा विश्‍वास, प्रयत्नांच्या चिकाटीत कधीच कसूर केली नाही. कोणत्याही गोष्टीने विचलित झालो नाही, असे ते आवर्जून सांगतात.

गरिबीची परिस्थिती असताना माझा लहान भाऊ संतोषने यशाची ज्योत तेवत ठेवत केलेला संघर्ष आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. देशाच्या अग्रगण्य संस्थेत तो शास्त्रज्ञ म्हणून काम करत असल्याने नक्कीच ऊर भरून आला आहे. त्याच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. 
- माधव पिंगळे, भाऊ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com