उपचारासाठी तरुणाला चिमुकल्यांची साथ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

गारवडेत खाऊ व वाढदिवसाचे पैसे साठवून केली कर्करोगग्रस्त युवकाला आर्थिक मदत 

कऱ्हाड - ऐन उमेदीच्या वयातच गारवडे (ता. पाटण) येथील ओंकार दिलीप शिंदे या 18 वर्षांचा युवकाला हाडाचा कर्करोग झाला. त्याच्या घरची परिस्थिती हालखीची. साधारण एक वर्षापूर्वीच आईचे निधन झाले. वयोवृद्ध आजी- आजोबांकडे राहणारा ओंकार या आजाराशी झुंज देत शिक्षण घेत आहे. त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याची माहिती गारवडेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळाली. विद्यार्थ्यांनी खाऊ व वाढदिवसाचे पैसे साठवून ओंकारला आर्थिक मदत दिली. 

गारवडे येथील ओंकार हा सध्या वयोवृद्ध आजी- आजोबांकडे जीवघेण्या आजाराशी झुंज देत शिक्षण घेत आहे. त्याच्या उपचारासाठी साधारणपणे पाच ते सात लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांच्या आजी- आजोबांना एवढा मोठा खर्च करणे शक्‍य नाही. त्याच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याची माहिती गारवडे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळाली. ओंकारला जीवदान मिळाव,य्यिासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, ही भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी साठवलेल्या व वाढदिवसासाठी खर्च होणाऱ्या पैशाची बचत करून जमलेले साडेदहा हजार रुपये ओंकारच्या उपचारासाठी मदत म्हणून शिक्षकांच्या उपस्थितीत ग्रामस्थांकडे दिले. 

ओंकारच्या उपचारासाठी आर्थिक मदत जमा करण्यासाठी गावातील तरुण मंडळे व ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थही आपपल्या परीने आर्थिक मदत देत आहेत. ओंकारच्या उपचारासाठी आणखी मोठ्या निधीची आवश्‍यकता असून, समाजातील दानशूर व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी किरण गौतम, गट शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप, केंद्रप्रमुख सुरेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

Web Title: Financial assistance youth