आजीच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

भारती हॉस्पिटल, पुणे - आशा आणि भाऊसाहेब वाघमारे आपल्या नातवासह. सोबत शंकर बत्ताले.
भारती हॉस्पिटल, पुणे - आशा आणि भाऊसाहेब वाघमारे आपल्या नातवासह. सोबत शंकर बत्ताले.

पौड - नातवाच्या उपचारासाठी भीक मागणाऱ्या आजी - आजोबांना मुळशीतील आदिवासी कल्याण संघाच्या युवकांनी मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविले. पाचलिंगवस्ती (ता. जुन्नर) येथील आदिवासी पाड्यातील या चिमुरड्याला या युवकांनी हर्नियाच्या उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांकडे पोचताच नातवासाठी अश्रू गाळणाऱ्या आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

अनिकेत सूरज वाघमारे या अडीच वर्षांच्या बालकास हर्नियाचा जन्मजात त्रास होत होता. जुन्नरच्या सरकारी दवाखान्यात त्याची अनेकदा तपासणी करण्यात आली. परंतु, तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या देत तेथील कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेली. नातवाचा आजार बरा होत नसल्याने आशा आणि भाऊसाहेब या आजी - आजोबांनी अनिकेत याला खासगी दवाखान्यात नेले. डॉक्‍टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वीस हजार रुपये खर्च सांगितला. अगोदरच एकवेळच्या जेवणाची भ्रांत त्यात वीस हजार रुपये खर्च ऐकल्यावर वृद्ध दाम्पत्याची पायाखालची वाळूच सरकली.नातवाच्या उपचारासाठी भीक मागून पैसे जमविण्याच्या उद्देशाने ते अनिकेतसह पुण्यात आले.

नातवाच्या उपचारासाठी मदत करा, अशी विनवणी करीत त्यांनी जेमतेम दोन हजार रुपये जमा केले. आणखीन अठरा हजारांची गरज होती. त्यासाठी भीक मागत ते घोटवडे फाटा (ता. मुळशी) चौकात आले. मंगळवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास फाट्यावरील हॉटेलमध्ये बसलेल्या विजय वाल्हेकर, उज्वल ववले, आशिष नागरे, सागर मत्रे, शेखर हुलावळे यांनी सदर आजीचे रडणे ऐकले. त्यांनी त्यांची चौकशी करत आदिवासी कल्याण संघाचे अध्यक्ष शंकर बत्ताले यांना बोलावून घेतले. बत्ताले यांनी त्यांची चौकशी केली.

जुन्नरला फोन करून वास्तविकता जाणून घेतली. मोबाईलवरून पूर्वीच्या उपचाराची कागदपत्रे मिळविली. ‘तुमच्या नातवावर आम्ही उपचार करतो. तुम्ही काळजी करू नका,’ असा धीर त्यांनी आजी-आजोबांना दिला. आमदार संग्राम थोपटे यांना ही बाब सांगितली. थोपटे यांनी भारती हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करण्याबाबत सांगितले. काँग्रेसचे पदाधिकारी विजय जाधव यांनीही हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्था केली. 

बुधवारी (ता. ५) सकाळी अनिकेतला भारतीमध्ये दाखल करण्यात आले. सर्व चाचण्या केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत पुढील उपचार मोफत केले जातील, असे डॉ. उमेश वैद्य यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com