वडापाव विक्री करून मुलांना दिले उच्च शिक्षण

- कमलेश जाब्रस
बुधवार, 8 मार्च 2017

शारदा सुपेकर यांचा दहा वर्षांपासून संघर्ष

माजलगाव -  कुटुंबाची परिस्थिती हलाखीची, जमीन नाही, उपजीविकेचे कसलेच साधन नाही, अशा स्थितीत मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालविण्यासाठी हातगाड्यावरून वडापाव, भेळ विक्री करीत मागील दहा वर्षांपासून दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी शहरातील शारदा सुपेकर यांचा संघर्ष सुरू आहे. 

शारदा सुरेशराव सुपेकर यांना संदीप व सुगम ही दोन अपत्ये. शारदा सुपेकर यांचे दहावीपर्यंत व त्यांचे पती सुरेशराव यांचेही जेमतेम शिक्षण झाले आहे. व्यवसायासाठी भाड्याने जागा घेणे शक्‍य नसल्याने यावर पर्याय म्हणून ते ग्रामीण रुग्णालयासमोर हातगाडा लावून वडापाव, भेळ, भजे, चहाची विक्री करतात. पोलिस ठाण्यासमोर हातगाडा असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. चवदार वडापाव व भेळ असल्याने ग्राहकांची मागणी असते. मुलगा संदीप हा येथील एका खासगी बॅंकेत आता नोकरीला लागला आहे, तर दुसरा मुलगा सुदीप अंबाजोगाई येथे पॉलिटेक्‍निकच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. मागील दहा वर्षांपासून हातगाड्यावरून हा व्यवसाय करीत मुलांच्या शिक्षणासाठी शारदाबाईंची धडपड सुरू आहे. त्यांना या कामी त्यांचे पती सुरेशराव मदत करतात.

घरच्या आर्थिक ओढाताणीमुळे मला इच्छा असतानाही शिक्षण घेता आले नाही. सासरीही आर्थिक परिस्थिती बेताचीच, पती शहरात हातगाड्यावरून वडापावसह इतर पदार्थांची विक्री करीत असत; परंतु ग्राहकी नसल्याने आर्थिक चणचण भासत होती. नाइलाजाने ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर दहा वर्षांपासून हातगाड्यावरून वडापाव, भेळ, भजे, चहाची विक्री करण्यास सुरवात केली. यातून काही पैसे मिळू लागले. जिद्दीने व नाउमेद न होता व्यवसाय करीत मुलांना घडविण्यासाठी धडपड सुरू आहे. एका मुलाला नोकरी मिळाल्याचे समाधान आहे, दोन खोल्यांचे हक्काचे घर घेता आल्यामुळे आनंदी आहे.
 -शारदा सुपेकर, वडापाव विक्रेत्या, माजलगाव