घोड्यावरून दहा किल्ले सर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - जिद्द असेल तर अपंगत्वावर मात करत आयुष्य आनंदाने आणि स्वाभिमानाने जगता येते. याचे उदाहरण म्हणजे पोपट खोपडे. त्यांनी घोड्यावरून जिल्ह्यातील तब्बल दहा किल्ले सर करण्याची किमया केली आहे. त्यांच्या कामगिरीची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड‘ने घेतली आहे. 

वयाच्या 40व्या वर्षी कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अपंगत्व आले. मात्र या परिस्थितीतही खचून न जाता त्यांनी जिद्दीने शारीरिक मर्यादांना भेदण्यासाठी आणि आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खोपडे (वय 47) मूळचे भोरमधील नाझरे गावचे आहेत. मे महिन्यात त्यांनी खवली ते सासवड असा 369 किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून आणि काही अंतर पायी चालत पूर्ण केला. या दरम्यान त्यांनी रायरेश्‍वर, केंजळगड, रोहिडेश्‍वर, राजगड, तोरणा, भुलेश्‍वर, लवासा, सिंहगड, मल्हारगड (जेजुरी) आणि पुरंदर हे किल्ले सर केले. 

याबाबत खोपडे म्हणाले, ‘माझ्या कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली याचा मला अतिशय आनंद आहे. प्रत्येक व्यक्तीने अपंग आणि सामान्य असा भेद न करता आपले आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असावे. शारीरिक मर्यादा असल्या तरी इच्छशक्तीच्या जोरावर त्यावर मात करता येते.‘‘ 

शारीरिक मर्यादांवर मात करून आनंदी आयुष्य जगण्याचा संदेश आणखी काही लोकांपर्यंत पोचावा यासाठी लवकरच शिवनेरी ते रायगड असा सायकल प्रवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.