भंगारातून कॉम्प्युटर बनवणारा जॉब्स... 

jayanta parab make a computer from Ewast
jayanta parab make a computer from Ewast

आपल्या मनाने एकदा का नवीन काही करायचं ठरवलं, तर एखाद्या खडकाळ जमिनीतूनही पाण्याचा झरा सापडतो. अगदी तसेच मनात असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जयंत परबने ई-कचऱ्याच्या भंगारातून कॉम्प्युटर तयार केला. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये आपल्या प्रगतीची गुढी उभारणाऱ्या या छोट्या स्टीव्ह जॉब्सचा हा प्रवास... 

आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्याचे उच्च शिक्षण घेताना पैशांचा अडसर येतो आणि हे जमले तरी अपेक्षित नोकरी मिळेल की नाही, याची साशंकता असते. पण मुंबईतील घाटकोपरमधे राहणाऱ्या जयंत रवींद्र परब या 17 वर्षीय तरुणाने मात्र शाळेतच असताना कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्कचे क्षेत्र निवडले. त्यात प्रावीण्य मिळवून फक्त अडीच हजारांत कॉम्प्युटरही तयार केला आहे. त्यात ड्युअल कोअर प्रोसेसर, 1 जीबी रॅम, 80 जीबी क्षमता असलेली हार्ड डिस्क, वाय-फाय, ब्ल्यू टूथ आणि स्पीकरची सोय दिली आहे. जयंतने फक्त अर्ध्या तासात भंगारातील ई-कचऱ्यापासून हा कॉम्प्युटर तयार केला आहे. पाचवीत असताना त्याच्या वडिलांनी त्याला बिघडलेला लॅपटॉप खेळण्यासाठी म्हणून दिला, खेळता-खेळता त्याने लॅपटॉप उघडून दुरुस्त केला. 
जयंतचे वडील रवींद्र परब आधी रिक्षाचालक होते, जोडधंदा म्हणून त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. वडिलांसोबत जयंत हे काम शिकू लागला. कार्यालये, रुग्णालये, शाळांमधील भंगार आणि ई-वेस्ट विकत घेण्यासाठी वडिलांसोबत तो जात असे आणि अचानक एके दिवशी जुने पार्टस्‌ वापरून कॉम्प्युटर बनवावा, अशी कल्पना त्याला सुचली. मग त्याने व्हेंटीलेटर नऊ इंच स्क्रीन वापरून हा कॉम्प्युटर तयार केला. तोही फक्त साडेपाच हजार रुपयांत. यापुढे तो गरजू मुलांना अद्ययावत कॉम्प्युटर बनवून वर्षभर त्याची सर्व्हिसिंग मोफत देणार असल्याचे सांगतो. 

अभ्यासात नापास... हार्डवेअर नेटवर्किंगमधे प्रावीण्य 
जयंतने नववीत नापास झाल्याने शिक्षण अर्धवट सोडले होते. शिक्षणाची आवडच कमी असल्याने त्याने शाळेकडे कायमची पाठ फिरवली. घराच्यांनीही त्याला विरोध न करता आवडीच्या क्षेत्रात शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अपयशाने न खचता जयंतने हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला. वडिलांच्या कामात हातभार लावत होताच. शिक्षण सोडले तरी त्याचा आत्मविश्‍वास ढळला नव्हता. कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये नव्याने आलेले तंत्रज्ञानही शिकत गेला. काळाप्रमाणे बदलण्याच्या त्याच्या या सवईमुळेच आज हे शक्‍य झाले आहे, असे त्याचे वडील रवींद्र परब सांगतात. जयंतला अभ्यासाठी कधीही आग्रह केला नाही. जे काम करशील त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न कर, इतकेच त्याला सांगितले होते. या वर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली. सर्व विषयही त्याला सोपे गेले आहेत. दहावीनंतर पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे जाण्यापेक्षा कॉम्प्युटरमधे नव्याने येणाऱ्या प्रणालीबाबत जाणून घेण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्याने सांगितले.

ई-कचऱ्याबद्दल निरक्षरता... 

आपल्याकडे ई-कचऱ्याबद्दल असाक्षरता असल्याने त्याच्या पुनर्वापराबद्दल कमी विचार केला जातो. मुंबईत नऊ हजार 400 टन ई-कचरा दरवर्षी तयार होतो, त्यापैकी तीन हजार टन कचऱ्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर केला जातो. कॉम्प्युटर इंजिनिअर्स आणि कुशल कारागीरांना सोबत घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जयंत हाती घेणार आहे. ई-वेस्ट गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कॉम्प्युटरचे वापरायोग्य पार्टस्‌ वेगळे केल्यास कॉम्प्युटर बनवण्याचा बराच खर्च वाचू शकेल. 

व्यवसायाभिमुख व्हा... 
या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा. विद्यार्थी आपला वेळ व पैसा शिक्षण घेण्यासाठी खर्च करतात, त्यापैकी सगळ्यांनाच मनासारखी नोकरी मिळत नाही, अशाने बेरोजगारी वाढते. व्यवसायाबद्दल नियोजन सुरू करून योजना आखली असता त्यात यश शक्‍य आहे, असे जयंतचे मत आहे. तो आणि त्याचे वडील सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे प्रशिक्षण देतात. नवउद्योजकांना त्याबद्दल व्यवसाय मार्गदर्शनही करतात. चांगली सेवा हेच व्यवसायाचे गमक असल्याचे जयंत सांगतो. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com