घोडावत ग्रुपची जानेवारीपासून बेळगावमधून विमानसेवा

गणेश शिंदे
सोमवार, 24 जुलै 2017

बेळगावमधून पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबईसह प्रमुख मोठ्या शहरांना तर दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांनाही जोडले जाणार आहे. घोडावत ग्रुपने हवाई सेवेच्या माध्यमातून मोठे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ग्रुपचा लौकिक वाढण्यास मदत होऊन भविष्यात ‘स्टार एअर’ यशस्वी झेप घेईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूरसह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटनाला गती मिळण्यास मदत होईल. हवाई सेवेचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे, याचा आनंद वाटतो. 
- संजय घोडावत, उद्योगपती

कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था

जयसिंगपूर - संजय घोडावत ग्रुपच्या वतीने जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’साठी एम्ब्रार-ई.आर.जे. १४५ एल.आर. या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, तिरुपती अशी हवाई सेवा सुरू केली जाईल. या हवाई सेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक, राजकीयसह इतर क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापुरातून बेळगाव विमानतळापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी विशेष बससेवाही सुरू केली 
जाणार आहे.

हवाई उड्डाण मंत्रालयातून त्यासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केली गेली आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत उर्वरित काही कायदेशीर बाबी पूर्ण होतील. संजय घोडावत ग्रुपने याआधी कोल्हापुरातून हवाई सेवेची परवानगी शासनाकडे मागितली होती. जवळपास सहा वर्षे त्यासाठी सातत्याने 
पाठपुरावा केला. 

रन वे, नाईट लॅंडिंग तसेच टर्मिनल बिल्डिंगच्या सुविधा शासन पातळीवरून उपलब्ध होऊ न शकल्याने हा प्रस्ताव मागे पडला. तरीही ‘विमानतळ विकसित करून द्या. व्यवस्थापन करू,’ असा प्रस्ताव ग्रुपने दिला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परिसराचा विकास अधिक गतीने होऊ शकणार होता; मात्र तसे झाले नाही. त्यानंतर घोडावत ग्रुपने बेळगावच्या सांबरा विमानतळाकडे लक्ष केंद्रित केले. 

नोव्हेंबर २०११ पूर्वी किंगफिशर एअरलाइन्सची सेवा कोल्हापूर विमानतळावरून सुरू होती. ही सेवा बंद झाली. त्याचा औद्योगिक विकासाला फटका बसून मोठ्या कंपन्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली. अशा स्थितीत घोडावत ग्रुप बेळगावमधून हवाई सेवेस प्रारंभ करत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या अविकसित भागाचा विकासही या प्रकल्पामुळे साधला जाणार आहे. कोल्हापुरातून बेळगाव विमानतळापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी विशेष बससेवाही सुरू केली जाणार आहे.