कोल्हापूर-गणपतीपुळे सायकलवरून प्रवास...!

jay
jay

कोल्हापूर - मुलाचं वय चौदा आणि बाबांचं बावन्न...दोघांनीही कोल्हापूर ते गणपतीपुळे असा सायकल प्रवास करायचं ठरवलं आणि एका दिवसात 155 किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. जय आणि त्याचे वडील सुनील सूर्यवंशी यांच्या जिद्दीची ही कथा. जयची बौद्धिक क्षमता थोडी कमी. अंगाने थोडासा जाड आणि अभ्यासात गती नाही. मुळात त्याला सामान्य मुलासारख्या काही गोष्टी करताच येणार नाहीत, असा अनेकांनी सल्ला दिलेला, पण वडील सुनील यांनी त्याला पोहायला शिकवलं. सायकल चालवायला शिकवली आणि आता तर त्यांनी कोल्हापूर ते गणपतीपुळे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा रत्नागिरी ते कोल्हापूर असा प्रवास तेरा तासात पूर्ण केला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्‍य ते शक्‍य करता येते, याची प्रचिती दिली.

सुनील सूर्यवंशी हे व्यवसायाने एलआयसी व जनरल इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. विवाहानंतर त्यांच्या संसारवेलीवर जय नावाचे हे फुल फुलले, मात्र जयची बौद्धिक क्षमता कमी असल्याचे लक्षात आले. अनेक उपचार झाले. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पण, सुनील यांनी हार मानली नाही. सामान्य मुलासारखीच त्यांनी जयलाही वागणूक दिली. शास्त्रीनगरातील घरापासून श्रीराम विद्यालय या शाळेपर्यंत कसे जायचे, याचेही विशिष्ट ट्रेनिंग दिले. त्यासाठी तीन महिने त्यांनी अखंड मेहनत घेतली. त्यानंतर जय स्वतः शाळेला जाऊ लागला. घरच्यांचा विरोध पत्करून जयला त्यांनी पोहायला शिकवले. पुढे जयची सायकल शिकायची इच्छा. तीही त्यांनी पूर्ण केली. शास्त्रीनगर ते शिवाजी विद्यापीठापर्यंत तो दररोज सायकल चालवू लागला. विविध शालेय स्पर्धांत तो सहभागी होऊ लागला. त्यासाठी रोज वीस ते पंचवीस किलोमीटर सायकलगचा सराव करू लागला आणि या स्पर्धांतही तो यशस्वी झाला. कोल्हापूर ते गणपतीपुळे असा सायकल प्रवास पूर्ण करण्याची त्याच्या वडिलांची इच्छा. मुळात या मार्गावरील घाट, मोठी वळणे त्यामुळे दम चांगलाच लागतो, पण अशा असंख्य संकटांवर मात करत एका दिवसात बाप-लेकांनी गणपतीपुळे गाठले आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. श्रीराम विद्यालयानंतर आता जय तवनाप्पा पाटणे विद्यालयात दहावीत शिकतो. त्याला मुख्याध्यापक एस. बी. सुतार, डी. बी. पाटील, सतीश भोसले यांचे मार्गदर्शन लाभते, अशी माहिती सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com