फाटक्‍या आयुष्यात तेजाळला ‘ज्ञानदीप’

कोल्हापूर - राजेंद्र नगर येथील ज्ञानदीप विद्यामंदीरची इमारत व परिसर.
कोल्हापूर - राजेंद्र नगर येथील ज्ञानदीप विद्यामंदीरची इमारत व परिसर.

अनेकांनी सोडली मळलेली पायवाट - ‘त्यांच्या’ आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश

कोल्हापूर - काहींचा बाप चोरी करणारा, आई भीक मागणारी, काही जणांचे कुटुंबच दारू तयार करणारे, काहींचे काच-पत्रा गोळा करणारे, अशा मोतीनगर-राजेंद्रनगर परिसरात १९९० ला एक ज्ञानदीप उभा राहिला.

‘ज्ञानदीप विद्यामंदिर’ असे त्याचे नाव. आज या शाळेतील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायापासून दूर राहिले आहेत. शिकले आहेत, सवरले आहेत.  खऱ्या अर्थाने त्यांच्या पूर्वीच्या फाटक्‍या आयुष्यात आज ज्ञानदीप तेवत आहे.

संस्थेच्या कल्पना तावडे यांनी समाजातील सृजनशील, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मदतीने शाळा उभी करण्याचा निर्धार केला. माळावर खोपाटात शाळा सुरू केली. दारू काढणाऱ्यांच्या घरात जायचे. आंघोळ घालण्यापासून ते केस विंचरण्यापर्यंत, शाळेत आणून बसविण्यापर्यंतचे काम करायचे. काही दिवसांनी मुलांना सवय लागली आणि बाप, आई घराबाहेर गेली की, मुले  शाळेत येऊन बसू लागली. शिक्षण दिले, एवढंच नव्हे तर आयुष्य घडविले. आज या ‘ज्ञानदीप’च्या प्रकाशात वाढलेले संतोष, सचिन, गजानन, ज्योती, विनोद, रेखा अशा अनेकांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे. 

शाळेतील संतोषची आई भीक मागायची, बहिणीही तिच्या बरोबर जायची. कधी कधी संतोषही जायचा. मात्र त्याला शाळेची गोडी लागली. दहावीत प्रथम श्रेणीत आला. मात्र निकालादिवशी तो शाळेतच आला नाही. अखेर सौ. थोरात, सौ. कुलकर्णी यांच्यासह कल्पना तावडे यांनी त्याची शोधाशोध केली.  तेंव्हा तो घराचे गळत असलेले घराचे छत झाकण्यासाठी जुना बाजारात प्लास्टिक कागद आणण्यासाठी गेल्याचे समजले. प्रथम श्रेणीत आला, पण त्याचा आनंद केवळ शिक्षकांनाच होता. संतोषच्या फाटक्‍या आयुष्यात प्रथम श्रेणीला काहीच किंमत नव्हती. पुढे तो बारावी नापास झाला आणि त्याने कोल्हापूर सोडले.  पुण्यात नोकरी करू लागला. आता तो चांगले पैसेही मिळवितो. पैसे मिळतील, पण आता शिक्षण मिळणार नाही. याचीही त्याला खंत आहे. पण आई भिक मागते हेच त्याला  पटत नव्हते. शिक्षणा पेक्षा पैसे मिळवून आईला चांगले ठेवायची त्याची जिद्द होती. आता तो आईला घेण्यासाठी येतो, पण ती जाण्यास तयार नाही. 

संतोष प्रमाणेच गजानन. त्याची आई काच-पत्रा गोळा करीत होती. तरीही ज्ञानदीप मधील शिक्षिकांमुळे त्याला शाळेत येण्याची गोडी लागली. तेथे तो शिकला आणि आज बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून रिक्षा चालक म्हणून स्वतःचे जीवन सुखाने आणि आनंदाने जगत आहे. 

ज्योती, मोलमजुरी करणाऱ्या बापाची मुलगी. एम.कॉम झाली. महसूल विभागात नोकरी करते. अर्जुनची कौटुंबिक परस्थिती सुद्धा याच पठडीतील. तरीही तो सावरला. एका खासगी कंपनीत नोकरी करून स्वतःचे जीवन सुखी केले आहे. कुष्टपीडीत असेला विनोदला तर बापाला तांब्याभर दारू दिल्याशिवाय शाळेत येता येत नव्हते. तरीही तो शिकला. दारूपासू दूर राहिला.  आज चालक म्हणून नोकरी करतो. ज्ञानदीप मधील हुशार मुलगी रेखा तर डीएड झाली. नोकरी लागली. आता सुखी संसार करीत आहे.

संस्कार उपयोगी ठरले
दारू तयार करणे, चोऱ्या करणे, भीक मागणे हीच परंपरा रोखण्याचे काम ‘ज्ञानदीप’ने केले. ‘बापाला अटक केली. त्याला आत टाकलंय,’ हे जी मुले सहज सांगत होती, ती आता या वाटेवरून दूर झाली आहेत. कोणीही दारू तयार करत नाही. चोऱ्या करत नाही. याला ‘ज्ञानदीप’चे संस्कार उपयोगी ठरले.  पण खऱ्या अर्थाने आज ज्ञानदीप तेवत आहे. असे वाटते, तसेच यापुढे जाऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती. ती अपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया कल्पना तावडे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com