अधिकारी व्हायचे राहिले... मन हमालीत रमले

शिवाजी यादव
रविवार, 24 सप्टेंबर 2017

आज वाटते अधिकारी झालो नाही; पण त्यांच्यापेक्षाही जास्त कष्टाचे काम करतो. समाधानाचे जगणे जगतो, वाचनाचा छंद जोपासतो, तिथे माझ्या समाधनाला प्रसन्नतेचा साज लाभतो, माझ्या व माझ्या कुटुंबाचे जगणे समृद्ध होते, इतरांचे जगणे समृद्ध करण्यासाठी माझ्या शिक्षणाचा वापर मी फावल्यावेळी करतो. मला हमालीचा अभिमान वाटतो.’’
- सचिन आवटे

कोल्हापूर -  ‘‘आयुष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी निकराची झुंज देतात; पण स्वप्ने साकार होतातच असे नाही, तसे माझेही झाले. मला नायब तहसीलदार किंवा फौजदार व्हायचे होते; पण होता आले नाही. मी गप्प बसलो नाही. पदवीधर असूनही हमाली काम स्वीकारले, सहा वर्षांत घाम गाळत पोती उचलून माझे आणि घरच्यांचे जगणे समृद्ध केले. मी अधिकारी झालो नाही म्हणून मी हरलो असे नाही, उलट अधिक सन्मानाचे जगणे जगतो. मी कष्टाचे, स्वाभिमानाचे, प्रामाणिकपणाचे आणि तंदुरुस्तीचे जीवन जगतो. याचा मला अभिमान वाटतो’’, अशी प्रांजळ भावना माथाडी कामगार सचिन उत्तरेश्‍वर आवटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

कोल्हापूर रेल्वे गुडस्‌ यार्डात साडेतीनशेहून अधिक हमाल आहेत, बहुतेक अल्पशिक्षित आहेत. त्या साऱ्यांत सचिन आवटे एकमेव पदवीपर्यंत शिक्षण झालेले व ‘एमपीएससी’ची परीक्षा दिलेले, तरीही सचिन हमाली करत बुद्धी इतकेच श्रमदेवतेवर प्रेम करतात.

उच्च अधिकारी बनवायचे हे स्वप्न बघतच काही पालक मुलाला शाळेत घालतात. मुलाची काळजी घेत शिक्षणासाठी हव्या त्या सुविधा देतात. तरीही मुले एक दोन वेळा परीक्षेत अपयश आले की, निराश होतात. पुढे पाच सहा वर्षे काहीच न करता वेळ वाया घालवतात, अशा अनुभवाला छेद देणारी कृती सचिन यांनी कष्ट पेरत कर्तृत्वातून दाखवून दिले. 

सचिन म्हणतो, ‘‘मी सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याचा, प्राथमिक शिक्षण तिथे झाले, झोपडी वजा घरात राहायचो, घरात फारसे कोणी शिकलेले नाही. मला अधिकारी बनवायचे, असे स्वप्न पालकांचे नव्हते. दहावीला चांगले गुण मिळाले, पदवीपर्यंत शिक्षण करमाळ्यात घेतले. आत्मविश्‍वास वाढला, तसा अधिकारी व्हायचे ठरवून किमान नायब तहसीलदार किंवा फौजदार व्हायचे म्हणून सलग दोन वर्षे अभ्यास केला. कोणताचा क्‍लास नाही, कोणाचे मार्गदर्शनही नाही तरीही ‘एमपीएससी’ची पूर्व परीक्षा पास झालो. मुख्य परीक्षेत थोडेच गुण कमी पडले, अधिकारी होण्याची संधीच गमावली. पुढे शासकीय नोकरीच्या प्रयत्नात दोन, तीन वर्षे घालावी लागणार होती. तो पर्यंत जगायचे कसे? रोजचा खर्च भागवायचा कसा? असा प्रश्‍न होता म्हणून थेट हमाली सुरू केली.’’

कुटुंबाची घडी बसविली...
‘गेली सहा वर्षे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत पन्नास किलोची दीडशे, दोनशे पोती उचलतो, घरी जातो, काम कधी चुकवत नाही, व्यसन नाही, प्रामाणिकपणे कष्ट केले, त्याच आधारे गावाकडे टुमदार घर बांधले. लग्न केले, मुलगी झाली, भावाला सात जर्सी गाई घेऊन दिल्या, दुसऱ्या भावाच्या कामाची व्यवस्था केली. पोटाला चिमटा लावून बचत केली, कष्टाच्या कामांतून शरीर तंदुरुस्त राहिले, औषध नाही की, दवाखान्यात ॲडमिट झालो नाही. अजून पंधरा, वीस वर्षे काम करू शकेन, असा आत्मविश्‍वास आहे.’