‘दूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची अनोखी जिद्द

‘दूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची अनोखी जिद्द

कोल्हापूर -  माणसाला जीवनात दूरदृष्टी असावी, असे म्हणतात आणि अशीही नको इतकी ‘दूरदृष्टी’ जमदग्नी काकांच्या वाट्याला कायमची आली आहे. दूरदृष्टी या अर्थाने, की त्यांना फक्त लांबचेच दिसते आणि जवळचे काहीही दिसत नसल्याने प्रत्येक काम चाचपडत करावे लागते. ७५ वर्षांचे जमदग्नी काका असे दूरदृष्टीचे आयुष्य एकटे जगत आहेत. पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात एकटे आहेत. जवळचे काही दिसत नाही. अशा परिस्थितीत घर झाडण्यापासून स्वतःसाठी जेवण करेपर्यंत रोज त्यांची जिद्दीची धडपड सुरू आहे. त्यांच्या वाट्याला आलेले हे आयुष्य आपल्या दृष्टीने हळहळ वाटणारे आहे; पण जमदग्नी काकांच्या मते ‘ऐसे जीने में भी मजा है’.
राजोपाध्येनगरातील नरसिंह रामचंद्र जमदग्नी यांच्या जगण्याची ही प्रेरणादायी कथा आहे. लहानपणापासून कष्ट वाट्याला. किरकोळ कामे करीत ते जगत राहिले. जिद्दी आणि प्रामाणिक स्वभावामुळे जेथे काम करायचे, तेथील लोकही त्यांना मदत करीत राहिले.

चित्रपट पाहणे हा त्यांचा एकच छंद. त्यामुळे सलग तीन चित्रपट पाहणे, हेच त्यांच्या सुटीच्या दिवसाचे काम राहिले. चित्रपट असे मन लावून पाहायचे, की प्रत्येक कलाकाराचे डायलॉग तोंडपाठ करायचे. त्यांच्या पत्नी अंजली घरकाम करायच्या. मूलबाळ नसल्याने दोघांचाच संसार व्यवस्थित चालवायच्या. चार वर्षांपूर्वी छोट्याशा आजाराचे निमित्त झाले व त्यांचे निधन झाले. वेळ अशी ,की जमदग्नी काकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला. वयोमानानुसार मोतीबिंदू असल्याने शस्त्रक्रिया केली; पण त्यात एका डोळ्याची दृष्टीच गेली. दुसऱ्या डोळ्याला त्रास सुरू झाला; पण जवळचे काही दिसत नाही व लांबचे दिसते, अशा टप्प्यावर त्रास येऊन थांबला.

पत्नीचे निधन झाल्याने जमदग्नी काकांचे असे एकाकी ‘दूरदृष्टी’ जीवन सुरू झाले. पहिले काही दिवस ते खचले; पण ‘खचला तो संपला’ असे म्हणत ते पुन्हा उभे राहिले. दृष्टिदोषामुळे जवळचे दिसत नसल्याने प्रत्येक वस्तूचा चाचपडत अंदाज घेऊ लागले आणि आता ते त्यांच्या सरावाचेच होऊन गेले.

एकटे राहणारे काका घर झाडतात, दूध तापवितात, चहा करतात. भात, भाजी, भाकरीही करतात. हे करण्यासाठी त्यांनी त्यांचे तंत्र वापरले आहे. घरातली प्रत्येक वस्तू त्याच जागी ठेवली, तरच त्यांना ती मिळत असल्याने ते प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवतात. एखाद्या डोळस माणसापेक्षाही आपल्या घरात ते लीलया वावरतात. त्यांना वाचायची हौस. पण, घरातले दिसत नसल्याने ते भरउन्हात जाऊन वृत्तपत्र वाचायला उभे राहतात. तळपत्या उन्हातच त्यांना मोठी मोठी अक्षरे दिसतात. त्यावर ते वाचनाची हौस भागवून घेतात.

‘ऐसे जीने में भी हमे मजा है’ 
जमदग्नी काकांच्या या परिस्थितीबद्दल कोणी हळहळ व्यक्त केली, तर तेच `हळहळू नका` असे म्हणतात. उलट या परिस्थितीतही आपण चांगले जगतोय, हे एखाद्या चित्रपटातला डायलॉग मारून सांगतात. प्राण हे खलनायक. पण, ते काकांचे आवडते नट. त्यामुळे प्राण यांचे डायलॉग ते सलग म्हणून दाखवितात. आणि ‘ऐसे जीने में भी हमे मजा है’ असे आवर्जून सांगतात. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विनायक कुलकर्णी त्यांना आवर्जून सहकार्य करतात.

जाहीर कौतुक होणार
जमदग्नी काकांच्या या आशादायी जगण्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिनी त्यांचे जाहीर कौतुक केले जाणार आहे. ‘काका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी ग्वाही देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com