चला, वंचितांच्या आयुष्यात चांदणं शिंपूया!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कोजागरी म्हणजे शीतलता आणि सौंदर्याच्या शांतीमय समन्वयाची अनुभूती. जीवनातील सकारात्मकतेचे, सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता. अशाच काही सजगतेच्या कारणांविषयी...

कोजागरी म्हणजे शीतलता आणि सौंदर्याच्या शांतीमय समन्वयाची अनुभूती. जीवनातील सकारात्मकतेचे, सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता. अशाच काही सजगतेच्या कारणांविषयी...

चालण्याचेही मिळवा समाधान
मूळचे कळंबा त्रिमूर्ती कॉलनी येथील नारायण इंदोलीकर सध्या पुण्यात मुलाकडे राहतात. दररोज सकाळी ते सात किलोमीटर चालतात. त्यातून ते निरोगी आरोग्य तर कमावतातच; पण त्याबरोबर दिवसाला ७० रुपयांचा निधी संकलित करतात आणि ती समाजातील वंचितांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना मिळते. अर्थात श्री. इंदोलीकर यांना त्यासाठी स्वतःकडील दमडीही खर्च करावी लागत नाही. दररोज चालताना ते ‘इम्पॅक्‍ट रन’ हे मोबाईल ॲप वापरतात आणि त्या माध्यमातून हा निधी संकलित होतो. श्री. इंदोलीकर आठ दिवस कोल्हापुरात आहेत आणि या ॲपविषयी ते सर्वत्र जागृती करत आहेत. 

काय आहे हे ॲप?

पुण्यातील काही युवकांनी नागरिकांना चालण्याची प्रेरणा देण्यासाठी ‘इम्पॅक्‍ट रन’ (IMPACT RUN) हे ‘मोबाईल ॲप’ विकसित केले आहे. केवळ चालण्याचीच नाही, तर चालता चालता समाजाला आर्थिक हातभार लावण्याची संधीही देऊ केली आहे. तुमच्या काही किलोमीटर चालण्यातून एखादा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होणार आहे; तर एखाद्या गरीब रुग्णाला चांगले उपचार मिळून तो रोगमुक्त होणार आहे. एवढेच नाही, तर एखाद्या निराधाराला तुमच्यामुळे जगण्यासाठी आधार मिळणार आहे.

मोबाईलवर डाऊनलोड केलेले हे ‘ॲप’ चालताना सुरू ठेवल्यास प्रत्येक किलोमीटरमागे चालणाऱ्याच्या नावे दहा रुपये जमा केले जातात. हे जमा पैसे काही निवडक संस्थांना निधी म्हणून दिले जातात. विशेषतः तुम्हाला हे पैसे कोणत्या संस्थेला दान करायचे आहेत, हे निवडण्याचे स्वातंत्र्यही तुम्हाला दिले आहे; तर प्रत्यक्ष तुमच्या खिशाला कोणतीही झळ पोहोचू नये याची काळजीही घेतलेली आहे. ‘डेव्हलपमेंट बॅंक ऑफ सिंगापूर’, ‘आरती इंडस्ट्रीज’, ‘केर्न इंडिया’, ‘हीरोतोटोकोर्प’, ‘वेलस्पन’ या कंपन्यांनी ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) फंडातून ही जबाबदारी उचलली आहे. अशाच प्रकारे झालेल्या निधी संकलनातून उत्तर काशीतील एका दुर्गम भागात नुकतीच एक शाळा सुरू झाली. जवानांच्या विधवांच्या सबलीकरणाचे कामही या निधीतून केले आहे. वॉकिंगसह रनिंग आणि सायकलिंग करतानाही हे ॲप वापरता येते.

पंढरपूर मामाचे गाव
कोल्हापुरातील काही तरुण प्रत्येक वर्षी पंढरपूर येथील मामाचा गाव प्रकल्पातील एचआयव्हीसह जगणाऱ्या तसेच निराधार व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांबरोबर दिवाळी साजरी करतात. त्याची तयारीही आता सुरू झाली आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही मंडळी पंढरपूरला रवाना होणार आहेत. सार्थक क्रिएशन्सने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फटाक्‍यांच्या पैशातून गरजूंना मदत
शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थी प्रत्येक वर्षी फटाक्‍यांचे पैसे वाचवून शाळेतीलच गरजू मुलांना ड्रेस आणि आवश्‍यक साहित्य देतात. यंदा ही मुले रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांना या पैशातून मदत करणार आहेत. निधी संकलनाचे काम आता सुरू झाले.

गरजू महिलेला द्या साडी
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर येथील लोटस मेडिकल फाऊंडेशन आणि आम्ही मैत्रिणी ग्रुपच्या वतीने गरजू महिलांसाठी दिवाळीची साडी हा उपक्रम सुरू झाला. आपल्या आवडत्या रंगाची किंवा आपली आवडती नवीन, वापरलेली, परंतु वापरता येण्यायोग्य साडी या उपक्रमांतर्गत जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले. १२ ऑक्‍टोबरपर्यंत शहरातील विविध भागातून या साड्या संकलित करून त्या गरजू महिलांना दिल्या जातील. सुमंगला पत्की (भक्तीपूजानगर, मंगळवार पेठ), अभिजित सावंत (विश्‍वपंढरी), वर्षा वायचळ (रुईकर कॉलनी), ऑटोनोव्हा (आदित्य कॉर्नर), आनंदसिंह शितोळे (महाद्वार रोड), बालाजी शॉप (राजारामपुरी आठवी गल्ली), बीफोरयू ब्युटी शॉप (शाहूपुरी दुसरी गल्ली), कलापी स्टोअर (शिवाजी रोड) येथे साड्या जमा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. किमया शहा, कविता मोदी, शलाका शहा, आशालता पाटील, अरुणा चौगुले, मंजुळा पिशवीकर, समीरा पवार, नीलिमा देशपांडे, भारती अभ्यंकर यांनी हा उपक्रम राबवला आहे.