काकवाईदेवीची परंपरा...अन्‌ कापडी पिशवी

सुधाकर काशीद
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  या देवीला फूल, नारळ, प्रसादाऐवजी कापड वाहण्याची पारंपरिक प्रथा, त्यामुळे भाविकांनी वाहिलेल्या कापडांचा ढीगच्या ढीग जमा झालेला. एका शिक्षकाने व त्याच्या विद्यार्थ्यांनी धाडसाने या कापडांना हात लावला आणि या कापडाच्या साहाय्याने पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवून पर्यावरणबचावासाठी या देवीचाच आधार घेतला.

कोल्हापूर -  या देवीला फूल, नारळ, प्रसादाऐवजी कापड वाहण्याची पारंपरिक प्रथा, त्यामुळे भाविकांनी वाहिलेल्या कापडांचा ढीगच्या ढीग जमा झालेला. हे कापड दुसऱ्या कामासाठी वापरायचे नाही, अशी देवाच्या नावाखाली कोणतीतरी भीती घातलेली. त्यामुळे कापडाचे ढीग पडून पडून सडलेले आणि फाटलेले. ही अवस्था अनेकांच्या मनाला खटकणारी; मात्र देवीच्या भीतीने सगळे गप्प; पण एका शिक्षकाने व त्याच्या विद्यार्थ्यांनी धाडसाने या कापडांना हात लावला आणि या कापडाच्या साहाय्याने पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवून पर्यावरणबचावासाठी या देवीचाच आधार घेतला.

दंत्तकथा, परंपरा यांना छेद देत, थेट वर्तमानाला भिडण्याचा हा वेगळा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यात मेघोली (ता. भुदरगड) धनगरवाड्यात घडला. गारगोटीतून आजऱ्याला जायचा जो मार्ग आहे, तो दाट झाडीचा, वळणावळणाचा आणि छोट्या छोट्या वाड्यावस्त्यांच्या कडेने जाणारा. या मार्गावर मेघोलीच्या धनगरवाड्याजवळ ‘काकवाई या देवीचे स्थान आहे. मूर्ती वगैरे काही नाही; पण मोठ्या झाडाखाली एक शिळा देवीचे प्रतीक आहे.

ही देवी या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान. गारगोटी-आजरा मार्गावरून जाणाऱ्यांसाठी क्षणभर विसाव्याचेही हे ठिकाण. या देवीच्या पूजेची पद्धत म्हणजे देवीला कापड अर्पण करायचे. त्यामुळे भाविक एखादी साडी, ब्लाऊजपीस किंवा साधारण मीटरभर कापड घेऊन येतात. भाविक गोरगरीब असल्याने कापड कॉटनचेच असते. ते कापड देवीला अर्पण करतात. अर्पण करतात म्हणजे देवीच्या शिळेजवळ या कडेपासून त्या कडेपर्यंत झाडांना बांधलेल्या दोरीवर कापड टाकतात. देवीपुढे हात जोडतात व निघून जातात.

त्यानंतर हे कपडे देवीच्या शिळेजवळ झाडावर बांधलेल्या दोरीवर लटकत राहतात. 
पावसाने भिजतात. उन्हाने रंगहीन होतात. वाऱ्याने उडून जातात. त्यामुळे परिसरात कपडेच कपडे दिसतात. यांतल्या एका कापडालाही कोणी हात लावत नाही. कारण या कापडाचा वापर कशासाठीही करायचा नाही, अशी देवीच्या नावाने भीती घातलेली आहे. त्यामुळे चोरही या कपड्यांना हात लावायचे धाडस करत नाहीत अशी परिस्थिती आहे.
यातून काय झाले, कपड्याचे छोटे मोठे ढीग या परिसरात तयार झाले. नक्की हे कपडे अन्य कारणासाठी वापरता आले असते; पण ते तसेच पडून राहिले.

अलीकडच्या काळात मात्र, अनेकांना वाटायचे, या कपड्यांचा पुनर्वापर व्हावा; पण कोणी प्रथा मोडायला धाडस करत नव्हते; मात्र कुमार मंदिरचे शिक्षक गोविंद पाटील व त्यांच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या हेतूने या कापडाचा पुनर्वापर करायचे ठरवले. ही जुनी प्रथा मोडून काढायची. लोकांना कपडे अर्पण करण्यापासून प्रवृत्त करायचे. पहिल्या टप्प्यात त्यांनी टोकाची भूमिका घेतली नाही. त्यांनी ढिगातील चांगले कपडे निवडले. गावाकडे आणले. त्याच्या कापडी पिशव्या बनवल्या व प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून त्या पिशव्या सर्वांना वाटल्या. त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी हे काम केले; मात्र अजूनही कापडाचा ढीग आहे.

कुणीतरी सुरवात करावी म्हणून...
देवीला कापड अर्पण करणारे भक्त आहेत. ही प्रथा एका प्रयत्नात किंवा एका वर्षभरात संपणार नाही, याची गोविंद पाटील सरांना जाणीव आहे; पण कोणीतरी सुरवात केली पाहिजे, म्हणून आपण हा प्रयत्न केल्याची त्यांची प्रामाणिक भावना आहे.