श्रमदान, स्वखर्चातून देवमाळावर वृक्षलागवड 

वसंत पाटील
सोमवार, 12 जून 2017

पिशवी - देवमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंड्या माळावर वनराई फुलवण्याचा ध्यास घेतलेल्या पिशवी (ता. शाहूवाडी) येथील भैरवनाथ पर्यावरण संस्थेच्या निसर्गप्रेमी तरुणांना मदतीसाठी अनेक निसर्गप्रेमी सरसावले आहेत. त्यामुळे निधीअभावी रखडलेले 1000 वृक्ष लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

गेल्या वर्षी जूनमध्ये 100 झाडांची लागवड केली. उन्हाळ्यात पाणीटंचाई असतानाही कावडीद्वारे पाणी घालून ही वृक्षसंपदा संस्थेने जगवली. यंदा या माळावर 1000 झाडे लावण्याचा संस्थेचा निर्धार आहे. याचे सविस्तर वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची व संस्थेच्या कार्याची दखल घेऊन अनेक निसर्गप्रेमींनी या कार्यास हातभार लावण्याची तयारी दर्शवली असून प्रत्यक्ष कामासदेखील जोमाने सुरवात झाली आहे. 

नायब तहसीलदार रवींद्र मोरे एक ते दीड किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी 2 इंची पाइपलाइन देणार आहेत. विक्रीकर निरीक्षक संदीप पाटील 200 रोपट्यांसाठी ग्रीन नेट देणार आहेत. संजय जाधव (महाराष्ट्र पोलिस) सामाईक ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य करणार आहेत. गावात टंचाई असतानाही सुरेखा पाटील या आपल्या विहिरीचे पाणी या वृक्षासाठी विनामोबदला देणार आहेत. 

नामदेव पाटील, आनंदा माळवी, बाळू व्हनागडे, महादेव जाधव, विठ्ठल पाटील, संदीप पाटील, विनायक पाटील, आकाराम पाटील, दत्तात्रय साळवी, सुरेश पाटील, संजय मोरे, आनंदा माने, बाबासाहेब मोरे, वसंत पाटील, महेश जाधव, बाबासाहेब आंबर्डेकर, दत्तात्रय शिंदे, वैभव जाधव, प्रकाश पाटील, आनंदा पाटील यांनीही रोपट्यांच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे. 

दरम्यान, पिशवी येथील मानस पाटील व सई जाधव या लहानग्यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत संस्थेला मदत केली आहे.