गणेशमूर्ती बनवण्याची मदत बनली आवड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ज्या ग्रामस्थांनी आमच्या कलेवर विश्‍वास ठेवत वडिलांना साथ दिली, त्यांचा विश्‍वास जोपासणे आमचे कर्तव्य होते. गेली ४ वर्षे आम्हीही या विश्‍वासाला सार्थ उतरलो आहोत. यापुढील काळातही आम्ही ही कला सुरूच ठेवणार आहोत.
- अमोल व ओंकार देवरूखकर

देवरूख - घरातच गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना, अभ्यास करताना वडिलांना मदत म्हणून आणि स्वतःची आवड म्हणून त्यांनी गणेशमूर्ती साकारायला सुरवात केली खरी, पण तोच छंद त्यांना आता वडिलांच्या पश्‍चात जोपासण्याची संधी मिळाली आहे. मूर्तिकार वडिलांच्या निधनानंतर दोघेही भाऊ आपल्या पित्याचा वारसा उत्तमरीतीने सांभाळत आहेत.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील धामणी-सोनारवाडी येथील अमोल व ओंकार देवरूखकर अशी या दोन भावांची नावे आहेत. सोनारवाडीतील अनंत देवरूखकर यांचा घरातच पारंपरिक गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने ते गेली ५० वर्षे हा छंदवजा व्यवसाय जोपासात आहेत. ओंकार आणि अमोल हे दोघेही त्यांचे चिरंजीव, शिक्षण करतानाच केवळ स्वतःची आवड म्हणून आणि वडिलांना थोडीफार मदत म्हणून हे दोघेही या मूर्ती कारखान्यात संध्याकाळच्या वेळी काम करतात. अनेक वर्षानंतर त्या दोघांनाही उत्तम मूर्ती घडवायला यायला लागलीच, शिवाय रंगकामातील बारकावे पाहून मूर्ती रंगवण्याच्या कामातही त्यांनी लक्ष घातले. यातून वडिलांच्या कामाचा भार थोडासा का होईना पण हलका झाला. 

दरवर्षी ते वडिलांच्या कारखान्यात आकर्षक मूर्ती घडवू लागले. याच कालावधीत ४ वर्षांपूर्वी वडिलांचे आकस्मित निधन झाले आणि देवरूखकर कुटुंबीयांकडे असलेली ही कला पुढे जाणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला. परिसरातील ३०० पेक्षा अधिक भाविक या चित्रशाळेतून मूर्ती नेतात. यामुळे वडिलांचा हा वारसा बंद न करता तो आपणच सांभाळायचा असा निर्धार या दोघांनी केला. ५० वर्षे वडिलांनी केलेली गणेशाची सेवा आपणही यापुढे करायची, असा निर्णय घेऊन गेले चार वर्षे हे दोघेही वडिलांचा कारखाना स्वतः सांभाळत आहेत. आजघडीला त्यांच्या कारखान्यात ३०० सुबक गणेशमूर्तींनी आकार घेतला आहे.