विश्‍वकर्मा फूड्‌स इंडियामध्ये उत्पादित सोया टोफू पनीर.
विश्‍वकर्मा फूड्‌स इंडियामध्ये उत्पादित सोया टोफू पनीर.

सोयापासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’  
कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा आदर्श नागझरी (ता. कोरेगाव) येथील संध्या संदीप दीक्षित यांनी आपल्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाद्वारे युवकांपुढे निर्माण केला आहे. सोयाबीनपासून दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणारे त्यांचे ‘स्टार्टअप’ इतरांना उमेद देणारे आहे.  

सातारा जिल्हा उद्योग केंद्रासह प्रधानमंत्री ग्रामीण स्वयंरोजगार योजना (पीएमइजीपी) व स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव शाखेकडून त्यांनी अर्थसाह्य मिळवत, सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगात गरुडझेप घेतली आहे. सोयाबीनवर आधारित त्यांनी निर्माण केलेल्या उपपदार्थांना बाजारातही चांगली मागणी वाढू लागली असून, त्यांची धडाडी आणि कल्पकतेमुळे आता संपूर्ण दीक्षित कुटुंबीयांनाच उद्योग विश्‍वातील नवे क्षितिज खुणावू लागले आहे. 

नागझरी येथील संदीप तुकाराम दीक्षित हे सुतार समाजामधील; परंतु वडिलोपार्जित सुतार व्यवसाय पोटापुरता, कुटुंबाच्या गरजेपुरताच मर्यादित राहिला. संदीप यांनी वडिलांच्या हाताखाली सुतारकाम शिकून घेताना बारावीपर्यंत शिक्षण घेतले; परंतु परिस्थितीने त्यांना पुन्हा त्याच कामात ढकलले. तरीही संदीप यांनी वडिलांच्या कामाला थोडे वेगळे रूप देत १९९७ मध्ये कोरेगाव येथे खादी ग्रामोद्योगकडून तीन लाख ८५ हजार रूपये कर्ज घेऊन शेतीसाठी पूरक बैलचलित लोखंडी शेती औजारे तयार करण्याचा श्रीगणेशा केला. हा उद्योग वाढवत तो कोरेगाव लघुऔद्योगिक वसाहतीत सुरू केला. त्यात त्यांना २००२ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सातारा जिल्हा उत्कृष्ट उद्योग पुरस्कारही मिळाला. अशातच शास्त्र शाखेचे शिक्षण घेतलेल्या संध्या यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. शिकल्या सवरलेल्या संध्या यांनीही चुलीपुरते मर्यादित न राहता आपल्या कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी धडपड सुरू केली. 

दरम्यान, परिसरात घेवड्याऐवजी सोयाबीनचे उत्पादन वाढू लागले होते. जागतिक स्तरावरील अभ्यासाअंती आहारात आवश्‍यक ४६ पैकी २९ प्रथिने ही सोयाबीनपासून मिळतात आणि त्याला चांगली मागणीही राहणार, हे लक्षात घेऊन दीक्षित दांपत्याने २०१० पासून सोयाबीनवर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचा विचार सुरू केला. श्री. दीक्षित यांनी भोपाळ (मध्य प्रदेश) येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सोयाबीन संशोधन केंद्र) अनेक प्रशिक्षणे घेतली. अनेक राज्यांत दौरा करून सोयाबीन उत्पादन, उपपदार्थ उत्पादनांची माहिती घेतली. पदवीधर पत्नी सौ. संध्या यांनीही आपली निरीक्षणे केली. त्यानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रथम जिल्हा उद्योग केंद्राकडे धाव घेतली. केंद्रातील अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेऊन प्रधानमंत्री ग्रामीण स्वयंरोजगार योजनेंतर्गत (पीएमइजीपी) स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव शाखेतून कर्ज प्रकरण करण्याचा सल्ला दिला. त्यांचा कर्जप्रस्ताव तातडीने मंजूर झाला. आश्‍चर्य म्हणजे ४८ तासांत शासनाचे आठ लाख ७५ हजार रुपये अनुदान खात्यावर जमाही झाले. उर्वरित कर्जफेड ७८ महिन्यांत करावयाची आहे. 

कर्ज मंजुरीनंतर दीक्षित दांपत्याने तातडीने या उद्योगासाठी भारतीय व परदेशी बनावटीची यंत्रसामग्री खरेदी करून ती कारखान्यात बसवली. शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा तीन ते चार रुपये जादा दराने तीन टन सोयाबीन खरेदी केले. अखेर सात ऑगस्ट २०१७ पासून विश्‍वकर्मा फुड्‌स इंडियामध्ये सोयबीन प्रक्रिया उत्पादनांना सुरवात केले आहे. त्यात १६ महिलांना रोजगार मिळाला आहे.  

सोया उत्पादने 
- सोया मिल्क (विविध फ्लेव्हरमध्ये)
- सोया टोफू पनीर
- सोया दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, रबडी, आईस्क्रीम, कुल्फी, बेकरी प्रॉडक्‍ट नानकटाई, बिस्कीट, केक, गुलाबजाम, हलवा आदी उत्पादने घेण्यात येणार आहेत.

मानवी शरीराला आवश्‍यक असणाऱ्या प्रथिनांचा समावेश असलेल्या सोयाबीनवर हायजेनिक व केमिकलरहित प्रक्रिया करून ही उत्पादने घेण्यात येत आहेत. आहारात ही उत्पादने घ्यावीत, असा सल्ला आता डॉक्‍टरही देऊ लागले आहेत.
- संध्या दीक्षित, संचालिका, विश्‍वकर्मा फूड्‌स इंडिया 

विश्‍वकर्मा फूड्‌स इंडियाच्या वतीने लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे सोया दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
- संदीप दीक्षित, संचालक, विश्‍वकर्मा फूड्‌स इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com