अंधारमय भविष्याला हवा मदतीचा प्रकाश

प्रकाश भालकर
बुधवार, 12 जुलै 2017

गरिबीशी झुंजणाऱ्या चिकुर्डेतील दिगंबर, नंदकुमारचे आठवीनंतरचे शिक्षण थांबले
कुरळप - जन्मापासूनच अठराविश्‍व दारिद्र्य असलेल्या चिकुर्डे (ता. वाळवा) येथील दोन चिमुरड्या भावंडांचे शैक्षणिक भवितव्य अंधःकारमय झाले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दोघांना नववीपासून पुढे आधारच नसल्याने पुढील शिक्षण थांबले आहे.  गरिबीच्या गर्तेत सापडलेल्या या भावंडांना दानशूरांनी हात देऊन पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज आहे.  

दिगंबर व नंदकुमार रघुनाथ सुतार अशी त्यांची नावे. धाकटा दिगंबर दहा दिवसांचा असताना आई वंदना यांचा मृत्यू झाला. नंदकुमार दीड वर्षाचा होता. त्यांचं मूळ  गाव कोल्हापूर. आईच्या मृत्यूनंतर मुलांचे वडील  रघुनाथ यांनी दोघांना अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र या मुलांच्या आईचे मामा शामराव गणपती सुतार (वय ७६) यांना ते पटले नाही. त्यांनी त्यांना चिकुर्डेत आणले. शामराव यांची जेमतेम कमाई होती. गावात जमीन नाही. सोमराज देशमुख यांनी राहण्यासाठी त्यांना आसरा दिला. मात्र तिथं विजेची सोय नाही. शामराव स्वतः अविवाहित आहेत. त्यांची बहीण शालन यांना विवाहानंतर पतीने सोडून दिले. त्यासुद्धा शामरावांच्या आसऱ्याला.

मुलांची मावशी बेबीताई याच कुुटुंबात त्यांनी विवाह न करता याच कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतला. शामराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करायचे. मात्र दोन वर्षांपूर्वी अपघातात त्यांचा उजवा पाय मोडला. अपघाताने सुतार कुटुंबाचे रहाटगाडगे थांबले. गेल्या वर्षी शालन यांना पक्षाघात झाला. औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना जागचे हलणे कठीण झाले. या साऱ्या संकटांना तोंड देत नंदकुमार आणि दिगंबर यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आठवीपर्यंत शासनाकडून पुस्तके, गणवेश दिला जातो. घरात खाण्या-पिण्याचे वांदे, आजाराने त्रस्त असणारे नातलग अशा परिस्थितीत पुढील शाळेचा खर्च घालणार कोण? या विचाराने पोरांनी घरात बसणे पसंत केले. 

१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. बरोबरची सारी मुलं शाळेकडे जाताना पाहून दिगंबर आणि  नंदकुमार अस्वस्थ होतात. समाजातील व्यक्ती, संस्थांनी त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शैक्षणिक भवितव्य तेजोमय करायला हवे.