कसबा बीडच्या 5 महिलांची दुग्ध व्यवसायातून प्रगती 

सागर चौगुले
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

माजगाव - रिलायन्स फाऊंडेशन व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने कसबा बीड (ता. करवीर) येथे झालेल्या "शास्त्रशुद्ध दुग्ध व्यवसाय' प्रशिक्षण शिबिराच्या मार्गदर्शनामुळे येथील पाच महिलांनी या व्यवसायात प्रगती करून आर्थिक उन्नती साधली आहे. प्रशिक्षणातून व्यवसायातील शास्त्रशुद्ध माहिती व बारकावे समजल्याने व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याचे महिलांनी सांगितले. 

ग्रामीण भागात दूध व्यवसायात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. व्यवसायातून उत्पादकांची प्रगती व्हावी या उद्देशाने बीड येथे सहा महिन्यांपूर्वी महिलांसाठी विनामूल्य दोन दिवसीय "शास्त्रशुद्ध दुग्ध व्यवसाय' प्रशिक्षण शिबिर झाले. यात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय आसवले यांनी जनावरांचे आरोग्य, ओला सुक्‍या चाऱ्याबरोबरच खाद्याचे प्रमाण, खाद्यामध्ये इतर घटकांचा समावेश, गोठ्याची स्वच्छता, वासरू संगोपन, दुधाळ जनावरांची निवड, विमा पॉलिसी, दूध उत्पादनात व फॅटमध्ये वाढ कशी करावी आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले होते. या माहितीच्या आधारे येथील राजश्री चौगले, अनिता तिबिले, सारिका सातपुते, सुचित तिबिले, व सविता तिबिले या महिलांनी या व्यवसायाला आधुनिकरणाची जोड दिली. त्यांना वेळोवेळी रिलायन्स व "माविम'चे मार्गदर्शन मिळाले. 

या महिलांनी पूर्वीच्या जनावरांमध्ये वाढ केली. मार्गदर्शनामुळे जनावरांचे आरोग्य सुधारून दूध क्षमतेमध्ये वाढ झाली. प्रति जनावरामागे दोन ते तीन लिटर दूध वाढले. फॅट वाढले. वासरू संगोपन नीट होऊ लागले. त्यामुळे घरच्या घरी दुधाळ जनावरांची संख्या वाढली. पूर्वी दर दहा दिवसाला या महिलांना 1000 ते 1200 रुपये दुधाचे बिल मिळत होते. ते वाढून ते 2500 ते 3500 रुपयेपर्यंत मिळू लागले आहे. 

यापूर्वी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करत होतो. पण म्हणावा तसा फायदा होत नव्हता. पण या प्रशिक्षणामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. पुन्हा अशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व्हावे. 
- अमिता तिबिले, सदस्या, सत्यभामा बचत गट 

या व्यवसायातील शास्त्रशुद्ध माहितीअभावी हा धंदा तोट्याचा ठरत आहे. या धंद्यामध्ये आधुनिकरण होऊन दूध उत्पादकांचा फायदा होण्यासाठी आम्ही अशी शिबिरि गावोगावी घेणार आहोत. 
- मारूती खडके,  जिल्हा व्यवस्थापक, रिलायन्स फाऊंडेशन