धडपड, आयुष्याचं चित्र साकारण्यासाठी...! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

चित्रकलेसाठी मी आईलाच गुरू मानतो. डोळ्याने दिसत नाही याची मला कधीच खंत वाटली नाही. या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा माझा भाऊ व मित्र राजू चोरमोलेकडून मिळाली. 
- महेश मस्के 

पुणे - "तो' एका डोळ्याने अंध, हातात चित्र रेखाटण्याची कला; पण परिस्थिती रुसलेली. आई-वडिलांच्या मोलमजुरीवर घर चालायचं. मग काय नदीकाठी जनावरं चरायला घेऊन चिखलाचा कागद अन्‌ काठीची पेन्सिल. मोठ्या भावानं शिक्षण अर्धवट सोडून "त्याला' साथ दिली. आता तो गाव सोडून पुण्यात आलाय मोठी झेप घेण्यासाठी, आपल्या आयुष्याचं चित्र रेखाटण्यासाठी...! 

महेश मस्के... निसर्गानही साथ सोडलेल्या बार्शी तालुक्‍यातील जामगावच्या महेशला जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नाही. बारावीपर्यंतचे शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो पुण्यात आला. भारती विद्यापीठात त्याची कला बहरू लागली. वडापाव खाऊन दिवस काढले, मित्रांनी मदत केल्यानंतर चित्रकलेचे साहित्य खरेदी केले. 

महेशच्या भावाने स्वत:चे शिक्षण सोडून छोटा-मोठा व्यवसाय करून महेशला पैसे पाठविण्यास सुरवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पाटेकर, राज ठाकरे, सिंधूताई सपकाळ, खासदार संभाजीराजे आदींची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटली. आपली प्रतिमा बघताना या मान्यवरांनीही त्याच्या कलेचे कौतुक केले. शिक्षण घेताना विविध अडचणींवर मात करून महेश एक-एक पाऊल टाकत आहे. 

मोफत उपचार 
डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला असताना महेशने एका डॉक्‍टरला चित्र काढून दिले होते. चित्र रेखाटताना डोळ्याला त्रास होऊ लागला. त्या वेळी त्याच डॉक्‍टरांनी माझ्या डोळ्यावर मोफत उपचार केले, अशी आठवण महेशने सांगितली. 

Web Title: Mahesh mhaske struggle for life