'तनिष्का' भगिनींचा दहा चिमुकल्यांना आधार

प्रमोद सावंत
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मालेगाव - अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्‍टर उलटल्याने सात शेतमजूर महिलांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी पाच महिलांची चिमणी पाखरे उघड्यावर आली आहेत. मातृछत्र हरपलेल्या वडेल येथील या दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमने उचलला आहे.

नैसर्गिक आपत्ती वा दुर्घटना घडल्यास "तनिष्का' मदतीसाठी धावून जातात, याची प्रचिती पुन्हा वडेलच्या दुर्घटनेनंतर आली. या दुर्घटनेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रोजीरोटीची लढाई लढणाऱ्या सात शेतमजूर महिलांचा बळी गेला. यातील उषाबाई भदाणे यांची मुले दीपाली (इयत्ता दुसरी), दिव्या, नीलेश (बालवाडी), रंजना महाले यांचा मुलगा जयदेव (अकरावी), संगीता महाजन यांची मुले आशिष (अकरावी), गायत्री (आठवी), संगीता भदाणे यांची ओम (दुसरी), साई (पहिली), रोहिणी शेलार यांची अनिता (आठवी), अमर (पाचवी) अशा दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमच्या मालेगावप्रमुख प्रतिभा अहिरे व सदस्यांनी घेतली आहे.

मालेगाव शहर तनिष्का प्रतिनिधी नीलिमा पाटील व तनिष्का सदस्यांनी आज सकाळी सामान्य रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमी महिलांची विचारपूस केली. या वेळी सौ. अहिरे, प्रतिभा पवार, नयना चौधरी, कल्पना सूर्यवंशी, कुसूम बच्छाव आदींसह सदस्या उपस्थित होत्या.

रोजीरोटीची लढाई लढणाऱ्या महिलांचे प्राण गेल्याने समाजमन हेलावले. मातृछत्र हरपलेल्या 10 चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. "सकाळ'च्या प्रेरणेतून हे बळ मिळाले.
- प्रतिभा अहिरे, प्रमुख, तनिष्का व्यासपीठ शिक्षक फोरम