कुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा

कुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा

परभणी - जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये कुपोषणमुक्तीसाठी परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत. 

अंगणवाड्यांतील मुला, मुलींना तसेच गरोदर मातांना पोषणमूल्ययुक्त सकस आहार मिळावा, कुपोषणमुक्ती व्हावी या उद्देशाने एकात्मिक महिला व बालविकास कार्यक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ पोषण मिशनअंतर्गत रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत ११४ अंगणवाड्यामध्ये परसबागा तयार करण्यात आल्या. परसबागांमध्ये केळी, पपई ही फळझाडे, बीट रूट, पालक, चुका, शेवगा, वांगी, टोमॅटो, फ्लॅावर, कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड प्राधान्याने केली जात आहे.

२०१६ मध्ये पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथील अंगणवाडीमध्ये परसबाग निर्मितीसाठी देवस्थान तसेच ग्रामस्थांनी मदत केली.अंगणवाडीताई अश्विनी वाघ, मदतनीस भाग्यश्री वाघ या सेंद्रिय पध्दतीने परसबागेचे व्यवस्थापन करत आहेत.या अंगणवाडीमध्ये आधी कुपोषित तीव्र श्रेणीतील १४ लहान मुले होती. परसबागेतील भाजीपाला, फळांचा आहारामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे ही मुले सामान्य श्रेणीत आली आहेत. याबद्दल पर्यवेक्षिका बी. बी. यादव यांचा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राधाताई विठ्ठलराव सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, विस्तार अधिकारी डी. आर. कदम आदींसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अंगवाड्यामध्ये परसबागा विकसित होत आहेत. यामुळे माता आणि बालकांच्या कुपोषमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे.

प्रत्येक अंगणवाडीत परसबाग...
येत्या वर्षात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे पोषणमूल्ययुक्त आहार मिळेल. कुषोषणमुक्तीसाठी मदत होईल.
- डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जिल्हा परिषद, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com