घराभोवती फुलवले फुलपाखरू उद्यान! 

घराभोवती फुलवले फुलपाखरू उद्यान! 

घराच्या सजावटीसाठी निसर्गाची मदत घेता घेता निसर्गातच हरवून जाण्याचा अनुभव मिरजेतील मंदाकिनी मराठे यांनी घेतला आहे. वनस्पतीशास्त्राचे कोणतेही मूलभूत ज्ञान नसताना केवळ आवड आणि अभ्यासाच्या जोरावर घराभोवती बगीचा फुलवला; त्यातून अतिशय सुंदर फुलपाखरू उद्यान आकाराला आले आहे. मराठे मिल परिसरातील त्यांच्या निवासस्थानी दिवसभर विविध रंगांची व जातीची फुलपाखरे बागडत असतात; मन प्रसन्न करत असतात. 

घराभोवतालचा बगीचा फुलवण्यासाठी मराठे यांनी विविध जातींची झाडे लावली आहेत. यामध्ये वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अनेक दुर्मिळ झाडांचाही समावेश आहे. देखभाल व जोपासनेमुळे बगीचा चांगलाच फुलला; त्यावर फुलपाखरांचा वावर सुरू झाला. त्यांची संख्या लक्षवेधी प्रमाणात वाढल्याचे मंदाकिनी मराठे यांच्या ध्यानी आले. त्यातूनच फुलपाखरू उद्यानाची संकल्पना आकारास आली. फुलपाखरे रुजण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास केला. त्यातून अनेक अनुभव येत गेले. फुलपाखरे रुजावीत यासाठी झाडांवर रासायनिक औषधांचा वापर जाणीवपूर्वक टाळला. रासायनिक खतांनाही फाटा दिला. बागेत निर्माण होणाऱ्या कचऱ्यातूनच कंपोस्ट खताची निर्मिती केली. फुलपाखरांना खाद्य म्हणून पुष्परसांची गरज असते. त्यासाठी मुबलक फुले व पुष्परस देणारी झाडे हेतुपूर्वक निवडली. झेंडू, घाणेरी, संकासूर, सुपारीची फुले, सदाफुली, एक्‍झोरा, पेंटास, व्हरबिना यांना प्राधान्य दिले. वेगवेगळ्या फुलांचा बहर वेगवेगळ्या महिन्यात असतो; हे लक्षात घेऊन वेगेवेगळ्या महिन्यात फुलणारी झाडे लावली; त्यामुळे सध्या बाराही महिने कोणत्या ना कोणत्या झाडावर फुले बहरलेली असतात. अंड्यातून बाहेर पडणारी फुलपाखरांची अळी खाद्य म्हणून पानांचा फडशा पाडते; हे लक्षात घेऊन विशिष्ट जातींची झाडे लावली; त्यावर फुलपाखरे प्रजनन करतात; त्यामुळे फुलपाखरांचा बारमाही वावर घराभोवती राहिला आहे. 

प्रत्येक फुलपाखराची झाडे निवडण्याची विशिष्ठ आवड असते. प्लेन टायगरला रुईचा वृक्ष आवडतो. वड किंवा उंबरावर कॉमन क्रो रमते. कढीपत्ता किंवा लिंबूवर्गीय झाडे लीम बटरफ्लायला आवडतात. या आवडी-निवडी लक्षात घेऊन झाडे लावली; त्यामुळे अनेक जातींची फुलपाखरे येत राहीली. पंखांवरील थक्क करणाऱ्या नक्षीसह विविध विभ्रम करत बागडणारी पुलपाखरे म्हणजे मंदाकिनी मराठे यांच्या घराची अमूल्य निसर्गसंपत्तीच ठरली आहे. 

फुलपाखरे येत राहिली तरी त्यांची ओळख करून घेणे महामुश्‍कील काम होते. सांगलीतील हिरवळ ग्रुपमध्ये मंदाकिनी मराठे सदस्या आहेत. फुलपाखरांच्या ओळखीसाठी हा ग्रुप कामी आला. त्यातून अनेक जातींची फुलपाखरे सहजी ओळखता येऊ लागली. त्यांचे फोटोसेशनही त्यांनी केले आहे. सुमारे 20 ते 25 जातींची फुलपाखरे घराभोवती येत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे; त्यात महाराष्ट्राचे राजमान्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मनचाही समावेश आहे. घराभोवती इतकी निसर्गसंपदा असताना घराच्या सजावटीतही त्याचा शिरकाव साहजिकच आहे. बागेतील छोटी झाडे, मोडलेल्या फांद्या, अर्धवट रोपे इत्यादी वेस्टेज घेऊन छोटी छोटी लॅंडस्केप त्यांनी बनवली आहेत. घरात वावरताना सिमेंटच्या इमारतीऐवजी एखाद्या उद्यानात आल्याची भावना होते. संपूर्ण घरच वेलींनी आच्छादल्याने घराला वेगळाच लुक आला आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही मंदाकिनी मराठे यांचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात सुरू होते; आणि मावळतो तो फुलपाखरांच्या साक्षीनेच !! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com