मांजरी खुर्दमध्ये घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मांजरी खुर्द - मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचा सन्मान ही एक चळवळ बनू पाहत आहे. ग्रामीण भागात या गोष्टीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रमेश उंद्रे यांनी शिरूर तालुक्‍यातील एका जिल्हा परिषद गटाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या गावातील प्रत्येक घरांवर मुलींच्या नावाची पाटी झळकविण्याचा ध्यास घेतला आहे. 

स्वतःच्या घरासह काही मित्रांच्या घरापासून त्यांनी ही सुरुवात केली असून, ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनाही याबाबत सकारात्मक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कु. ऋतुजा उंद्रे, कु. रोहिणी नेवाळे,  कु. अनिता उंद्रे, कु. किरण बांगर, कु. ज्ञानेश्वरी सावंत, कु. शिवनंदिनी मत्रे या मुलींच्या पालकांनी त्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याने उंद्रे यांनी लागलीच त्यांच्या नावाच्या पाट्या बनवून त्या-त्या घराच्या दरवाजावर लावल्यादेखील आहेत. अनेक पालकांनी आपल्याही घरावर अशा पाट्या लावण्याची मागणी उंद्रे यांच्याकडे केली आहे. या वेळी पालक रामभाऊ बांगर, महादेव सावंत, संजय गरूड आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून स्वागत
उंद्रे यांनी गावातील मुलींच्या पालकांना भेटून घरातील मुलींच्या सन्मानाची संकल्पना समजावून सांगितली. दरवाजावर घरातील मुलींच्या नावाची पाटी लावण्याच्या या संकल्पनेचे अनेक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Web Title: manjari khurd home girl name board