अरुणाताईंची ‘थाळी’

अरुणाताईंची ‘थाळी’

शेतात रोजगारावर काम करणारी बाई ते शेकडो जीवांना रोज अन्न वाढणारी अन्नपूर्णा असा अरुणा टेके यांचा जगण्याचा प्रवास आहे. या प्रवासात संघर्ष होता, आयुष्यभर लक्षात राहणारे धडे होते आणि उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आव्हान होतं. अरुणाताईंनी संघर्ष केला. धडे पचवले आणि आव्हान पेललं. खाद्यपदार्थांचा व्यवसाय स्थिरावला. अरुणाताईंच्या कामाला व्यवसाय म्हणता येणार नाही. त्यांची थाळी द्रौपदीची आहे. अनेकांना खाऊ घालूनही न संपणारी...

अरुणाताईंच्या दुकानात पापड, कुरड्या आणायला आलेल्या एक बाई, रंगीत पापड मागत होत्या.
‘ताई, ते वेगवेगळ्या रंगाचे पापड द्या’
‘एकाच रंगाचे आहेत. रुखवताला पाहिजेत का?’
‘हो’
‘पोरगीही द्यायची आणि सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू देण्यासाठी धडपडही पोरीच्या आई-बापानंच करायची.’ अरुणाताई ज्या तोऱ्यात बोलत होत्या, त्यात एक आत्मविश्‍वास होता. आजपर्यंत घेतलेल्या बऱ्यावाईट अनुभवाचं बळ शब्दांतून व्यक्त होत होतं. शाळेच्या दारात गोळ्या विकण्यापासून सुरू झालेला व्यवसाय आज लाखाच्या उलाढालीपर्यंत पोचला होता. त्यातून आलेला अनुभव शब्दांत उतरत होता.
रुग्णालयातल्या ६०-७० जणांना रोज सकाळ-संध्याकाळ डबे पुरवणं, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर घेणं, बचत गटांकडून पापड, कुरड्या अशा वस्तू तयार करून घेऊन त्यांची विक्री करणं, असं अरुणा टेके यांच्या व्यवसायाचं स्वरूप आहे. यशस्वी उद्योजिका, मुलांचं चांगलं आयुष्य घडवणारी आई, सामाजिक कार्यकर्ती अशी अनेक विशेषणं आज त्यांना लावता येतील. ती मिळवताना त्यांना सोसावे लागलेले कष्ट आणि त्यासाठीची जिद्द थक्क करणारी आहे.  

पुण्यापासून साधारण १५० किलोमीटरवर मंचर हे बाजारपेठेचं गावं. छोटे रस्ते, छोटी घरं असं गावाचं रूप सांगणाऱ्या खुणा इथं पावलोपावली दिसतात. या गावात एक छोटं दुकान अरुणाताईंनी थाटलं आहे. तिथंच त्यांची भेट झाली. एकाच जागेत पार्टीशन घालून त्याचे दोन भाग केलेले. बाहेरच्या भागात काचेच्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारचे पापड मांडून ठेवलेले. आतल्या छोट्या भागात गॅस, काही मोठे डबे आणि स्वयंपाकासाठी लागणारं जुजबी सामान. दोन-तीन बायका बसू शकतील, अशी रिकामी जागाही त्यातून तयार केलेली. एवढ्या छोट्या गावात, छोट्या जागेत ही बाई तीन-चारशे माणसांचा स्वयंपाक करते. लाखोंच्या उलाढाली करते, हे वरकरणी पटत नव्हतं.

अगदी सुरवातीच्या दिवसापासून आयुष्याच्या संघर्षाची पोतडी अरुणाताईंनी उघडली आणि त्या बाईच्या जिद्दीला सलाम करावा वाटला.
पंचवीस वर्षं उलटली त्या गोष्टींना...सामान्य आयुष्य जगण्यासाठीही संघर्ष सुरू होता. लग्न आणि त्यानंतर मुलं, घरची गरिबी असं अत्यंत सामान्य आयुष्य अरुणाताईंच्या वाट्याला आलं होतं. सामान्य आयुष्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती; मात्र आपण जगायचं कसं आणि मुलांना जगवायचं कसं हा मूलभूत प्रश्‍न होता. घरचा पाठिंबा फारसा नव्हता. कामावर गेलं तरच पोटाची खळगी भरेल आणि आपल्या पोरांच्या पोटातही चार घास जातील, याची जाणीव त्यांना होती.
‘जगण्यासाठी काम करायचं, म्हणून मी कामाला जात होते,’ अरुणाताई आयुष्यातल्या पहिल्या संघर्षाबद्दल बोलू लागल्या... बोलतानाही कामात खंड नव्हता. नाचणीचे लाडू वळता वळता त्या सांगू लागल्या, ‘खेडेगावात काम ते काय, शेतीचं. रोजगारीवर जायचं. जेमतेम ७० रुपये मिळायचे. तेही काम अनिश्‍चित. शेतावर कामाला गेल्यावर पोरांना कुठं ठेवायचं, हा प्रश्‍न असायचा. त्यांचे हाल होत होते. म्हणून ते काम बंद करावं लागलं. मग शाळेच्या दारात गोळ्या विकायचं काम सुरू केलं. तिथं पोरांनाही नेता येत होतं.’

अरुणाताईंमधली उद्योजिका तिथूनच पुढं आली. मुळातच गोड आणि बोलक्‍या स्वभावाचा फायदा अरुणाताईंना नव्या संधी मिळण्यासाठी नेहमीच झाला. ‘जिल्हा परिषदेमधले एक अधिकारी ओळखीचे होते. त्यांनी बचत गट काढण्याविषयी मला सुचवलं. बायका तर ओळखीच्या होत्या. बचत गटानं आपल्याला कसा फायदा होईल, ते बायकांना सांगितलं. पैसे ठेवायला सुरवात केली. एकदा एका बाईला अचानक शस्त्रक्रियेची गरज भासली. तिला पैसे लागणार होते. बचत गटातून पाच हजार रुपये मिळाले. तेव्हा एवढे पैसे मिळणं म्हणजे जीवन मिळण्यासारखंच होतं. बायकांनाही महत्त्व पटलं. अडीच हजार बचत गट तयार केले. बचत गटांमधून काम वाढवणं गरजेचंच होतं. बायकांना पापड करायला सांगितले. मीदेखील प्रशिक्षण घेतलं. तयार केलेले पापड विकायला हवेत. मग विक्री केंद्र सुरू केलं.’

अरुणाताईंना स्वयंपाक करण्याची आवड आहेच. बचत गटाच्या मदतीनं ही आवड व्यवसायात बदलली गेली. अरुणाताई म्हणाल्या, ‘पापड करण्याचं काम करताना मी राळ्याच्या पुऱ्यांच्या किंवा जेवणाच्या ऑर्डरही घेऊ लागले. गावाबरोबर बाहेरच्या गावांच्या ऑर्डरही मिळू लागल्या. राळ्याच्या पुऱ्या करणं कठीण काम असतं. त्या बनवून देण्याचं वेगळेपण मी ठेवलं. मला स्वयंपाकातले कष्टाचं काम करणं काही वाटतं नाही. चारशे माणसांचा स्वयंपाकही मी काही वेळात करू शकते.’
मला देवानं स्वयंपाक करण्यासाठीच जन्माला घातलंय, अशी अरुणाताईंची भावना आहे. अर्थात ती पॉझिटिव्ह. मी आयुष्यभर स्वयंपाकच करायचा का, हा तक्रारीचा सूर नाही. एका उदाहरणाची जोड देत त्या याबद्दल सांगत होत्या, ‘एकदा बचत गटाच्या बायकांना घेऊन मी अक्कलकोटला गेले होते. आम्ही सगळ्या जणी मठात बसलो होतो. तिथले एक गृहस्थ आले आणि एवढ्या बायकांतून मलाच म्हणाले, ताई, जरा पोळ्या करायला मदत हवी आहे, येता का?’ म्हणूनच मला वाटतं, देवाच्याच मनात आहे मी अन्नपूर्णा व्हावं. अगदी लेकीच्या लग्नाच्या आधी दोन दिवस मी चाळीस माणसांची जेवणाची ऑर्डर पूर्ण केली.’

खाद्यपदार्थांच्या या व्यवसायातून अरुणाताई घडत गेल्या. ‘खूप अनुभव आले मला आयुष्यात,’ त्या सांगत होत्या. ‘मी चटणीच्या ऑर्डरही घेत होते. एकदा एका साहेबांचा फोन आला. त्यांना शेंगदाण्याची आणि कारळ्याची चटणी हवी होती. मी ऑर्डर ऐकून खूश झाले. शंभर किलो चटणीची ऑर्डर. आता आपला व्यवसाय असाच मोठा चालणार या आनंदात काही बायकांच्या मदतीनं मी शंभर किलो चटणी केली. पोती भरून साहेबांकडं घेऊन गेले. साहेब त्या पोत्यांकडं बघतच राहिले. त्यांना एक किलो चटणी हवी होती. मला काहीच सुचेना. फोनवर ऐकताना माझीच चूक झाली होती.’
 ‘आता त्या चटणीचं का करायचं? तिथं विकायचा प्रयत्न केला; पण नाही जमलं. शेवटी जेवढी घेतली तेवढी दिली. उरलेल्या चटणीची पोती घेऊन परत येत होते. आता गावात ती परत न्यायची, हेही बरं वाटेना. त्याचं काय करायचं सुचेना. येताना वाटेत एक नदी लागली. नदी दिसताच मी गाडी थांबवली आणि सगळी चटणी नदीत ओतली. तेव्हापासून अगदी आजही मी फोनवर ऑर्डर घेताना किमान तीनदा विचारते. त्यांना काही वाटलं तरी चालेल; पण मी विचारतेच. आता मेसेज, व्हॉट्सॲप सोयी झाल्या आहेत. आता मेसेजवर ऑर्डर मागवते.’ अरुणाताईंचं स्वतःचं घडणं अशा अनेक प्रसंगांतून दिसतं. स्मार्ट फोनचा वापर स्मार्टली करायला आता त्या शिकल्या आहेत.

अशीच अनुभवाचा धडा शिकवणारी आठवण भीमथडी यात्रेची. अरुणाताई म्हणाल्या, ‘भीमथडीला स्टॉल उभा करावा, असं मला काहींनी सुचवलं. मी पिठलं-भाकरीचा स्टॉल मांडायचा ठरवलं. मदतीला तीन-चार बायकांना घेऊन गेले. पहिल्या दिवशी आमची काहीच विक्री झाली नाही. काय करायचं सुचत नव्हतं. आलेल्या बायकांचं जाण्या-येण्याचं भाडं तरी निघायला हवं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. लवकर आवरून तिथून बाहेर पडले. येताना उदबत्तीचे दोन-चार पुडे आणले. प्रत्येक स्टॉल सुरू होताना स्टॉलसमोर उदबत्त्या लावल्या. जवळजवळ साडेचारशे स्टॉल होते. प्रत्येकाला ती छोटी गोष्टही प्रसन्नता देत होती. मी उदबत्ती लावली की कोणी दोन-पाच-दहा रुपये देत होते. दहा रुपयांच्या पुड्यांतून मी जाण्या-येण्याचा खर्च काढला. आता स्टॉलसाठी आणलेल्या साहित्याचा प्रश्‍न होता. भाकरीचं पीठ, पिठल्यासाठी डाळीचं पीठ, वाटलेली मिरची, कोथिंबीर असं साहित्य होतं. मी सगळं एकत्र करायला सांगितलं. त्याची थालीपीठं बनवली. धान्याची खमंग थालीपीठं म्हणून विकली. लोकांना आवडली. सगळा माल संपवूनच आम्ही घरी परतलो.’

‘अशीच गोष्ट राळ्याचा पुऱ्यांची. राळ्याच्या पुऱ्यांना कष्ट खूप असतात. ते भिजवा, त्यानंतर इतक्‍या बारीक राळ्यांची साल काढा. मग त्याचं सारण बनवा. सुरवातीला मी पुऱ्या विकायला ठेवल्या. फारसा कोणाला हा प्रकार माहीत नव्हता. मी आपलं दहा रुपयाला एक घ्या, बरं दोन घ्या...असं करून विकत होते. तिथल्या एका बाईंनी सांगितलं, असं नका विकू. त्यामागच्या कष्टांची किंमत आहे. दहा रुपयाला एकच, असं विका. मग मी तसं केलं. पुऱ्या संपल्या आणि आता प्रत्येकवर्षी भीमथडीमध्ये मी पुऱ्यांचा स्टॉल ठेवते. शिवाय, अनेक ठिकाणांहून या पुऱ्यांची ऑर्डर असते. पुऱ्या आणि मासवडी असे दोन कष्ट करावे लागणारे पदार्थ आहेत; पण त्यातूनच मी माझं वेगळेपण जपलं आहे.’

‘अशा ऑर्डर घेतानाच जिल्हा रुग्णालयातल्या रुग्णांसाठी डबे देण्याचं काम मिळालं. जवळजवळ सहा वर्षं झाली मी हे काम करते,’ अरुणाताई सांगू लागल्या, ‘तिथल्या रुग्णांना सकाळी आणि संध्याकाळी मिळून असे जवळजवळ सव्वाशे ते दीडशे डबे मी पुरवते. त्याशिवाय सकाळी आणि दुपारी त्यांना चहाही देते. सकाळी चहा द्यायला गेल्यानंतर किती रुग्ण आहेत, कोणाची काय गरज आहे, याचा अंदाज येतो. आल्यानंतर लगेच डब्यांची तयारी सुरू होते. वेळेत आणि ज्यांना जसं हवं तसे डबे तयार होतात आणि पोच केले जातात.’

इतक्‍या वर्षांत कोणाची कधी तक्रार नाहीच, उलट त्यांचा डबा हा रुग्णांना बरं होण्याचा एक दिलासा वाटतो. कोणाला काय लागतं, याचा अंदाज अरुणाताईंना आता अचूक आला आहे. सकाळप्रमाणे संध्याकाळी चहा देऊन आल्या, की त्यांना संध्याकाळच्या डब्यांचा अंदाज येतो. या डब्यांची, अन्नाची नियमित तपासणी होते; मात्र तो एक नियमाचा भाग म्हणून. अरुणाताईंचा डबा आहे तोपर्यंत आम्हाला काळजी नाही, असं रुग्णालयातले संबंधित कर्मचारी सांगतात.

असे अनेक अनुभव घेत आणि व्यवसाय उभारणी करत अरुणाताई स्वतः स्वावंलबी झाल्या आहेतच; पण त्यांनी अनेकींना स्वतःच्या पायावर उभं केलं, हे विशेष. खाद्यपदार्थ किंवा डबे पुरवण्याच्या कामासाठी त्या काही जणींची मदत घेतात. त्यांना रोजगार मिळतो आणि अरुणाताईंना मदत. आपण कशा स्वावलंबी झालो, हे अनेक जणी सांगतात. आरती भालेराव असंच उदाहरण. लग्नानंतर नवऱ्याचा दुसऱ्या बाईशी संबंध आला. पदरात एक मुलगी होती. आरतीताई म्हणाल्या, ‘नवऱ्यानं मुलीला ठेवून घेतलं आणि मला हाकललं. इथं अरुणाताईंनी आधार दिला.’ आरतीताई सुरवातीला डबे बनविण्याच्या कामात मदत करत होत्या. त्यातून त्यांना पैसे साठविण्याविषयी अरुणाताईंनी सुचवलं. त्या पैशातून शिलाई मशिन घेतली आणि आरतीताईंनी आपलं आवडीचं शिलाईचं काम सुरू केलं. जोडीला पार्लरचा कोर्स पूर्ण केला आणि आता दोन्ही व्यवसाय सुरू आहेत. नवऱ्याचा त्रास सहन करण्यापेक्षा स्वतः मानानं, आनंदात जगणं चागलं ही आरतीताईंची आत्मविश्‍वासपूर्ण मानसिकता आता आहे.
सुनीता चपटे यांचं दुसरं उदाहरणं. त्यांना घरातून नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा आहे. त्या पाठिंब्याच्या बळावर छोट्या गावात त्यांनी गिरणी सुरू केली. सुनीताताई आता अनेकींना स्वतःच्या बळावर उभं राहायला शिकवतात.

अरुणाताई म्हणाल्या, ‘शक्‍य आहे तेवढ्या परीने मी बायकांना उभं राहायला मदत करते. एक आजी आहेत. त्यांना मोबाईल कव्हर करायला शिकवले. शक्‍य आहे त्या बायकांना ती कव्हर घ्यायला सांगते. त्या आजींना जगण्याचा तेवढाच आधार मिळतो.’ अरुणाताई हे सांगत असतानाच एक जोडप दुकानात आलं. त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि नंतर लग्न मोडलं. अरुणाताई त्यांना समजावत होत्या. पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यासाठी पाठिंबा देत होत्या.

आपण आयुष्याशी लढलो, तसं इतर कुणाला लढावं लागलं तर मदतीचा हात घेऊन अरुणाताई सतत तयार असतात. सामाजिक संस्थांमध्येही त्या काम करतात. गावातला भांडण-तंटा, जाच याविरुद्ध त्या आवाज उठवतात, त्या आवाजाचा आधार गावातल्या कित्येकींना आहे. गावाबाहेरही मैत्रींचा गोतावळा आहे. आयुष्यात माझी तीच कमाई, असं त्या आनंदानं सांगतात. बायकांना बदल हवा म्हणून स्वतः सहलीचं आयोजन करतात. स्वतःच्या जबाबदारीवर या बायकांना घेऊन जातात.

जसं गाव आनंदी हवं, तसं कुटुंब आनंदी हवं हा आग्रह तर आहेच. अरुणाताईंना चार मुली, त्यात एक जुळं आणि मुलगा. घरातून मुलासाठी आग्रह झाला असं त्या प्रामाणिकपणे कबूल करतात. स्वतःत बदल घडवत गेलेल्या अरुणाताई मुलांच्या करिअरबाबत जागरूक आहेत. आपण फारसं शिकलो नाही, मोठ्या मुलीच्या वेळेसही फारशी परिस्थिती नव्हती. त्यानंतर परिस्थिती घडत गेली तशी मुलंही. एक मुलगी डबल ग्रॅच्युएट होऊन नोकरी करते. जुळ्या मुलींमध्ये एक मुलगी सीएस, तर दुसरी वकिलीचं शिक्षण घेते. मुलगाही कॉलेजला आहे. पतीही आता व्यवसायात खूप मदत करत असल्याचं त्या समाधानानं सांगतात. शिवाय, ते एका सामाजिक संस्थेसाठीही काम करतात. आज माझं सगळं चांगलं आहे, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ओसंडून वाहतं.

अरुणाताई फक्त कष्ट उपसत गेल्या नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार स्वतः बदलत गेल्या, स्वतःला घडवत राहिल्या. मोबाईल आला तसा त्याचा वापर, मग स्मार्टफोन आला, त्या स्मार्ट झाल्या. दुचाकी आणि चारचाकी शिकल्या. छोटसं गावं. घरचा आधार नाही. शिक्षण नाही. आर्थिक परिस्थिती नाही. या सगळ्या ‘नाही’तून अरुणाताईंनी स्वतःचं आयुष्य ‘हो’ मध्ये बदललं. स्वतः रडत राहिल्या नाहीत. ज्या रडत होत्या, त्यांचे अश्रू पुसले नाहीत, तर त्यांच्यात निर्माण केला आत्मविश्‍वास न रडण्यासाठी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com