सकाळच्या 'ज्ञानाच्या बटव्याने' लावले चिमुकल्यांना वाचनाचे वेड

माणिक देसाई
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

'ज्ञानाचा बटवा' या काञणांच्या वाचन कार्डामुळे मला वाचनाची सवय लागली. त्यामुळे मला भारतरत्न मिळालेल्या तसेच विविध थोर व्यक्तींची माहिती मिळाली. मी आता दररोज घरीसुद्धा 'सकाळ'मधील विविध बातम्यांचे वाचन करते. तसेच मी 'सकाळ ज्युनियर लीडर' या स्पर्धेतदेखील भाग घेतला आहे.
- कु. यशश्री नागरे, विद्यार्थीनी, वैनतेय विद्यामंदिर

निफाड : आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. त्यांचा वर्तमान चांगला असेल तर देशाचे भविष्यही उज्ज्वल असेल. मुलांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे.

बालपणापासून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी शाळेत एक अभिनव उपक्रम राबविला.

'सकाळ'मध्ये रोज प्रसिद्ध होणाऱ्या नाशिक येथील  डाॅ.कैलास कमोद यांनी संकलित केलेल्या  'ज्ञानाचा बटवा' तसेच 'बोधकथा या काञणांचा संग्रह करून तो विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिला. शिक्षक सानप यांनी काञणांचा संग्रह करून जुन्या वह्यांच्या पुठ्ठ्यावर रंगीत चिकट टेप आकर्षक पद्धतीने चिकटवून अतिशय कमी खर्चात विद्यार्थ्यांसाठी वाचन कार्ड तयार केले. या कार्डावर पुढील बाजूस 'ज्ञानाचा बटवा' व मागील बाजूस 'बोधकथे'चे काञण चिकटवले आहे. 

ज्ञानाचा बटवा या सदरात कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान, गणित, समाजसेवा, साहित्य, संत, क्रांतिकारक व राजकीय क्षेञात उल्लेखनीय कार्य केलेल्या थोर व्यक्तींची थोडक्यात व महत्त्वपूर्ण सचिञ माहितीचे वाचन विद्यार्थ्यांना करता येते. तसेच थोरामोठ्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रेरणादायी प्रसंगाच्या बोधकथेतून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळू शकते.
      
शाळेतील दैनिक परिपाठात विद्यार्थ्यांना या वाचन कार्डाचे वाटप करून त्याचे वाचन करून घेतले जाते. रोटेशन पद्धतीने कार्ड बदलून तसेच मधल्या सुट्टीच्या वेळेत हे वाचन कार्ड वर्गातच उपलब्ध असल्याने विद्यार्थी आपल्या सोयीनुसार आनंददायी पद्धतीने आपल्या वाचनाचा छंद जोपासताना दिसतात.

या वाचनामुळे चिमुकल्यांच्या ज्ञानात भर तर पडणारच आहे त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया ही नकळत भरला जाणार हे नक्की!

कमी खर्चात आपल्या कल्पकतेचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि .दा. व्यवहारे, अॅड ल. जि. उंगावकर, राजाभाऊ राठी, अॅड. दिलीप वाघावकर, राजेश सोनी, किरण कापसे, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाड पं. स. गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका अलका जाधव व पालकांनी कौतुक केले.