केळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला लागला हातभार

केळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला लागला हातभार

जळगाव शहरातील प्रियंका आणि हर्षल नेवे हे मध्यमवर्गीय दांम्पत्य. त्यांना गीतेश आणि यश ही दोन मुले. प्रियंका नेवे यांचे शिक्षण दहावीपर्यंत तर हर्षल हे बारावी पास आहे.  जळगाव शहरात हे दांपत्य भाडेतत्वावर राहते. प्रियंका यांनी उपवासासाठी मागणी असलेल्या  केळीच्या विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीचे कौशल्य त्यांच्या आत्या सुचिता नेवे व शोभा वाणी, सासू शीला नेवे आणि आई प्रतिभा माहूरकर यांच्याकडून आत्मसात केले. उपवासाचे नवे पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन त्या यू ट्यूबच्या माध्यमातूनही घेतात. प्रक्रिया व्यवसायास सुरवात करण्याची संकल्पना त्यांना नितीन वाणी यांनी सुचविली. 

 उपवासाचे चवदार, पौष्टीक पदार्थ  
प्रियंका यांनी बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन केळीचे लाडू, पराठा, चिवडा, शेव, गुलाबजाम, वेफर्स बनविण्यास सुरवात केली. गुलाबजाम बनविण्यासाठी केळीचे पीठ, मावा, साखरेचा पाक वापरला जातो. लाडू बनवायला केळीचे पीठ, साखर, तूप वापरतात. जशी मागणी असली त्यानुसार तुपाचा वापर केला जातो. काही ग्राहक देशी गाईच्या तुपात तर काही साध्या तुपाचे लाडू त्यांच्याकडून बनवून घेतात. तेलरहित वेफर्सही त्या बनवितात. त्यासाठी आवश्‍यक कच्ची केळी त्या आपल्या आत्या शोभा वाणी यांच्याकडून खरेदी करतात.

पराठ्यासाठी केळीचे पीठ, तिखट, मीठ, मसाला व बटाटा वापरला जातो. केळीची शेव निर्मितीसाठी केळीचे पीठ, तिखट, मीठ वापरले जाते. केळीच्या चिवड्यासाठी सुका मेवा, शेंगदाणे व कच्ची केळी वापरली जातात. चिवडा बनविण्यासाठी त्यांनी एक लहान यंत्र घेतले आहे. दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे पावडर या घटकांपासून त्या उपवासाची चटणी तयार करतात. या चटणीलादेखील चांगली मागणी आहे. प्रियंका नेवे या उपवासाच्या पदार्थांच्या निर्मितीसह मेस चालवितात. सध्या रोज पाच जेवणाच्या डब्यांची ऑर्डर आहे. ५० रुपये प्रतिडबा असा दर  आहे.

 ओल्या हळदीच्या लोणच्याला पसंती  
प्रियंका ओली हळद व हिरव्या मिरचीचे लोणचे बनवितात. हिरव्या मिरचीचे लोणचे, हिरवी मिरची आणि लोणचे मसाला, तेल आदींचा वापर करून बनविले जाते. यासोबत गुजराती पदार्थांमध्ये प्रसिद्ध असलेले खस्ता, चिरोटे व खाजेही त्या मागणीनुसार तयार करून देतात. 

  योग्य पॅकिंगमधून विक्री  
 ग्राहकांच्या मागणीनुसार केळीचे उपपदार्थ आणि लोणचे ५० आणि १०० ग्रॅममध्ये उपलब्ध करून दिले जातात. सर्व पदार्थ हे प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग केले जातात. पॅकिंग करण्यासाठी एक लहान यंत्र त्यांनी घेतले आहे. पदार्थांचे दरही वजनानुसार निश्‍चित केले आहेत. पराठा प्रतिनग १५ रुपये या दरात विकला जातो. त्यासोबत दही चटणी असते. केळीचे वेफर्स  ६० रुपये पाव किलो, केळीचा चिवडा ७० रुपये पाव किलो, केळीची शेव ६० रुपये पाव किलो, जवसची चटणी १५ रुपयात ५० ग्रॅम, हळदीचे लोणचे आणि मिरचीचे लोणचे २० रुपयात १०० ग्रॅम या दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. उत्पादनांच्या दर्जामुळे ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे.

   नातेवाइकांकडूनच प्रचार 
प्रियंका यांना पदार्थ निर्मितीसाठी नातेवाइकांचे जसे मार्गदर्शन आहे, तसे खाद्य पदार्थ किंवा उपवासाच्या केळीच्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नातेवाइकांनीची चांगली मदत होते. जळगाव शहरातील त्यांचे नातेवाईक ओळखीच्या लोकांच्या पर्यंत प्रक्रिया पदार्थांची माहिती देतात. अशातूनच ही उत्पादने ठिकठिकाणी पोचू लागली. जळगाव शहरातील एका किराणा दुकानासह जिल्हा सहकारी दूध संघाचे दूध विक्री करणाऱ्या काही स्टॉलवरही या उत्पादनांची विक्री होऊ लागली आहे.

   मार्केटींगसाठी घरातूनच मदत
बाटलीमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीत लोणचे पॅक केले जाते.  सध्या प्रक्रिया उत्पादनांची घरातच त्या निर्मिती करतात.तो हळूहळू वाढविण्यासाठी प्रियंका यांना त्यांचे पती हर्षल यांचीही मदत होते. हर्षल हे उपपदार्थांचे पॅकिंग तसेच विक्रीसाठी मदत करतात. जळगाव शहरातील शाळा आणि विद्यालयांमध्ये जाऊनही खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. काही शाळांमधील शिक्षक व कर्मचारी त्यांचे पदार्थ आगाऊ सूचना देऊन तयार करून घेतात. याचबरोबरीने जिल्हास्तरीय मुक्ताई सरस, कृषी महोत्सव, बहिणाबाई महोत्सवात प्रियंका आवर्जून सहभागी होतात. महोत्सव, प्रदर्शन यांच्या माध्यमातून उत्पादनांची जाहिरात व विक्रीही आपसूकच होते. काही मॉलमध्येही केळी प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी पोचावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.गीतेश या ब्रॅंन्ड नेमने  येत्या काळात केळीचे पदार्थ व इतर खाद्य पदार्थांच्या विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे.

प्रियंका नेवे,  ९४२२७५८५०५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com