धुणीभांडी करणाऱ्या महिलेची लेक झाली ‘सीए’

धुणीभांडी करणाऱ्या महिलेची लेक झाली ‘सीए’

मिरज - अठराविश्‍वे दारिद्र्याचा शाप भाळी असतानाही त्याचे शल्य न बाळगता त्यावर मात करून परिस्थितीला झुकवण्याची किमया करता येते, हे धुणीभांडी करून पोटाची भूक भागविणाऱ्या मातेच्या कन्येने करून दाखविले आहे. येथील रेवणी गल्लीत एका छोट्याशा खोलीत राहून चार्टर्ड अकौंटंटच्या पदवीला गवसणी घालण्याचा पराक्रम रेखा मगदूम हिने केला आहे. सध्या येथे रेखाच्या या यशाचीच चर्चा सुरू आहे.

रेवणी गल्लीत अगदी वळचणीला एका चंद्रमौळी झोपडीवजा सहा बाय आठच्या खोलीत राहणाऱ्या आणि चार घरची धुणीभांडी करून सामान्य जीवन जगणाऱ्या शकुंतलाची लेक ‘सीए’ झाली आहे. ज्या परीक्षेचा निकाल केवळ तीन टक्‍क्‍यांपासून अधिकाधिक केवळ पंधरा टक्‍क्‍यांपर्यंतच लागतो, त्या परीक्षेत रेखाने जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर यशाला गवसणी घातली. 

शकुंतला संजय मगदूम यांच्या पोटी रेखाचा जन्म झाला; पण केवळ महिनाभरातच शकुंतला यांचा पती संजय घर सोडून परागंदा झाला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. परिस्थितीशी दोन हात करीत उभे राहण्याचा निर्धार त्यांनी केला. ‘म्या शिकले नाही; पण माह्या मुलीला मातुर शिकीवणारच, एवढंच ध्येनात ठिवलं आनि राबले, चांगली मानसं बी भेटली, आनि माझी ल्येक परीक्षा पास झाली’ या तिच्या प्रतिक्रियेतच रेखाच्या यशासाठीची तिची इच्छाशक्ती दिसून येते. 

आईची तळमळ पाहून रेखानेही हे आव्हान लीलया पेलले. आज मुलगी रेखा ‘सीए’ झाली म्हणजे नेमकी काय झाली, हे माऊलीला काही माहीत नाही. 
पतीने घर सोडल्यानंतर शिक्षण नसल्याने चार घरची धुणीभांडी करून लेकीचं आणि आपलं पोट भरत घराचा गाडा हाकण्याचे काम शकुंतला यांनी सुरू केले. आपल्या मुलीला शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. डोक्‍यावर छत पाहिजे म्हणून या मातेने ७०० रुपये भाड्याने सहा बाय आठची खोली घेतली. कधी धुणीभांडी, कधी स्वयंपाकपाणी असे पडेल ते काम करून रेखाचा सांभाळ केला. उच्चशिक्षण दिले. आजही घराची स्थिती वेगळी नाही. चारच भांडी, अंथरुण-पांघरुणही तोकडे. अतिशय मितभाषी; पण नजरेत आणि वागण्यात ठासून आत्मविश्‍वास जाणवणारी रेखा सध्याच्या अर्थकारणातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

संघर्षाची ‘किनार’
‘सीए’चा अभ्यास म्हटले, की लाखो रुपयांची खासगी क्‍लासची फी, महागडी पुस्तके हे रेखाला कधीच मिळाले नाही. घरीच अभ्यास करून तिने मिळविलेल्या यशाला संघर्षाची लखलखती किनार आहे. मायलेकीच्या याच संघर्षमयी वाटचालीचे अनेक साथीदार आणि साक्षीदारही आहेत. या सर्वांबद्दलची कृतज्ञता आणि लेकीच्या यशाचे कौतुक सांगताना शकुंतला माऊलीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबलेले असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com