तरुणांनी शोधला आधुनिक मत्स्यपालनाचा मार्ग

संदेश सप्रे 
गुरुवार, 27 एप्रिल 2017

देवरूख - नोकरी मिळत नसल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यातील कळंबस्ते येथील तीन तरुणांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाचा व्यवसाय करीत कोकणात मासेपालनाचा व्यवसायही उभारी घेऊ शकतो, हे सिद्ध केले आहे.

देवरूख - नोकरी मिळत नसल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यातील कळंबस्ते येथील तीन तरुणांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाचा व्यवसाय करीत कोकणात मासेपालनाचा व्यवसायही उभारी घेऊ शकतो, हे सिद्ध केले आहे.

कळंबस्ते येथील मज्जीद नेवरेकर, इनायत काजी आणि फिरोज नेवरेकर अशी या तरुणांची नावे आहेत. नोकरी शोधूनही सापडत नसल्याने तिघांनी काहीतरी नवे करण्याचा ध्यास घेतला. मासेपालन करण्याचा व्यवसाय करायचे निश्‍चित करून त्यांनी तशी माहिती गोळा करण्यास सुरवात केली. इस्लामपूर येथे जाऊन त्यांनी तेथील प्रगतशील शेतकरी स्वप्नील माणिकराव कदम यांच्याकडे या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावी आलेल्या या तिघांसमोर हा व्यवसाय करण्यासाठी जागा आणि भांडवलाचा प्रश्‍न होता. 

या तिघांची जिद्द पाहून फणसवणे येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते आलीम मोडक यांनी त्यांची कोचेवाडीतील तीन गुंठे जागा त्यांना उपलब्ध करून दिली. गावातील अनेकांनी या तिघांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. यातून त्यांनी १५ बाय ३५ फूट लांबी आणि रुंदी, १० फूट उंचीची तीन तळी निर्माण केली. शेजारच्या नदीवर पंप बसवून त्यातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी एक लाखांचा खर्च आला. त्यानंतर त्यांनी इस्लामपुरातून मुगुर, कटली, वाम, कोळंबी या जातीचे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे ३० हजार मासे खरेदी केले. मार्च महिन्यात त्यांनी या व्यवसायाला सुरवात केली. सध्या येथील मासा चारशे ते पाचशे ग्रॅम वजनाचा झाला आहे. आतापर्यंत माशांचे खाणे, देखभाल यावर त्यांचा २ लाख ९० हजार खर्च झाला आहे. यातील ७० मासे उष्णतेमुळे मरण पावले. पुढील दोन महिन्यात हे सर्व मासे अर्धा किलो ते दीड कीलो वजनाचे झाल्यावर त्यांची विक्री केली जाणार आहे. यातून आठ ते नऊ लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. या व्यवसायावरचा सर्व खर्च वजा जाता यातून किमान ३ लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.