"खाकी'तील माणुसकीने दोघांना मिळाली दृष्टी 

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - खाकी वर्दीतील जरब असलेली नजरही भावव्याकुळ होते. दुसऱ्याच्या वेदना समजल्यावर पोलिसाच्याही डोळ्यांत पाणी येते. अशाच एका पोलिसाचा तरुण मुलगा दगावला. डोळ्यांसमोर अंधार पसरला. अश्रू पुसत असतानाच या पोलिसाने सर्वांना चकित करणारा निर्णय घेतला. मुलाचे डोळे त्याने दान केले. त्यामुळे दोघांना हे जग बघण्याची संधी मिळाली आहे. 

मुंबई - खाकी वर्दीतील जरब असलेली नजरही भावव्याकुळ होते. दुसऱ्याच्या वेदना समजल्यावर पोलिसाच्याही डोळ्यांत पाणी येते. अशाच एका पोलिसाचा तरुण मुलगा दगावला. डोळ्यांसमोर अंधार पसरला. अश्रू पुसत असतानाच या पोलिसाने सर्वांना चकित करणारा निर्णय घेतला. मुलाचे डोळे त्याने दान केले. त्यामुळे दोघांना हे जग बघण्याची संधी मिळाली आहे. 

वरळी पोलिस वसाहतीतील आनंद रामचंद्र सावंत हे मुंबई पोलिस दलात आहेत. सतीश (वय 26) हा त्यांचा मुलगा होता. जन्मापासून तो गतिमंद होता. त्याला सतत मिरगीची फिट यायची. त्याच्यावर अनेक रुग्णालयांत उपचारही करण्यात आले. मुलाचे आयुष्यमान कमी असल्याने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात आल्या. 21 एप्रिलला पहाटे त्याची प्रकृती खालावली. आनंद सावंत यांनी शेजारी राहणाऱ्या डॉक्‍टरांना बोलावले. डॉक्‍टरांनी तपासून सतीशला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला; मात्र शोकाकुल अवस्थेतही सावंत यांनी मुलाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पत्नीचीही समजूत काढली. 

मृत्यूनंतर काही वेळात नेत्रपटल काढावे लागते. सावंत यांनी मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्याकरिता पाच तास पायपीट केली. डॉक्‍टर प्रमाणपत्र द्यायला तयार नव्हते. प्रमाणपत्र मिळत नसल्याने नेत्रपेढीचे डॉक्‍टर येत नव्हते. अशा स्थितीत सावंत यांनी अनेकांशी संपर्क साधला. डोळे कोरडे पडू नयेत म्हणून ते त्यावर भिजवलेल्या कापसाचे बोळे ठेवत होते. अंत्यविधीला उशीर होत असल्याने नातेवाईक अस्वस्थ झाले होते; पण सावंत नेत्रदानावर ठाम होते. पाच तासांनंतर अखेर प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर काही वेळात जे. जे. नेत्रपेढीतील डॉक्‍टर सावंत यांच्या घरी आले. त्यांनी सतीशचे नेत्रपटल काढून नेले. त्यातून दोघांना दृष्टी मिळाली. 

सरपंचाचे पोलिस आयुक्तांना पत्र 
मुंबई पोलिस दलात असलेले रत्नकुमार बळिराम पंडित यांच्या मुलाचा एप्रिलमध्ये मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. त्यांनीही मुलाचे अवयवदान केले. साताऱ्यातील एका गावातील सरपंचाला हे कळताच त्याने मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहून पंडित यांचे कौतुक केले. 

समाजाचे देणे लागत असल्याने मुलाच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचे ठरवले. माझ्या मुलाच्या नेत्रांमुळे दोघांना नवीन आयुष्य मिळाले आहे. मीही मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- आनंद सावंत, पोलिस शिपाई, मुंबई