२२ वर्षांनंतर झाली भेट

२२ वर्षांनंतर झाली भेट

नागपूर - मानसिक धक्का बसल्याने नकळत तो रेल्वेच्या डब्यात शिरला. कुठे जायचे ठाऊक नाही. कुठे पोहोचला माहिती नाही. नागपूरच्या रेल्वे फलाटावर फिरत होता. नाव-गाव सांगता येत नव्हते. भाषाही निराळीच. रेल्वे पोलिसांच्या मदतीने न्यायालयामार्फत नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रवानगी झाली. पाच वर्षांच्या उपचारात युवकाला बोलते करण्याचे काम मनोरुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. कुटुंब शोधले व बोलावले. कुटुंबीयांना बघताच तो गहिवरला आणि घरी रवाना झाला. पस्तिशीतील या युवकाचे नाव जोगिंदर साहू असे आहे.

ही चित्रपटाची कथा नाही, तर नागपूरच्या मनोरुग्णालयात घडलेला प्रसंग आहे. जोगिंदर हा मूळचा ओडिशा राज्यातील. २२ वर्षांपूर्वी घरातून निघाला व रेल्वेच्या डब्यात बसला. कधी मुंबई, तर कधी चेन्नई असा १६ वर्षे रस्त्यावर फिरत होता. २०१२-१३ मध्ये नागपूर रेल्वे फलाटावर फिरत असताना पोलिसांना संशय आला. मनोरुग्ण असल्याचे समजले. 

रेल्वे पोलिसांनी न्यायालयामार्फत प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. मनोरुग्णालयाने त्याचे नामकरण केले. खोटे नाव घेऊन तो जगत होता. उपचारातून भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनघा राजे, संध्या दुर्गे, केवल शेंडे आणि मंथनवार यांचे प्रयत्न सुरू होते.
अचानक एक दिवस भाषेवरून ‘ओडिशा’ नाव पुढे आले. तेथूनच सामाजिक कार्यकर्त्यांनी शोधमोहीम सुरू केली. हळूहळू जोगिंदरला भूतकाळ आठवू लागला. कुटुंबीयांचा शोध लागला. आईसोबत संवाद साधला. एकमेकांची ओळख पटल्यानंतर नातेवाईक आणि जोगिंदर यांच्या भावनांचा बांध फुटला.

मानसिक विकारातून बरे झाल्यानंतर इतरांप्रमाणेच सामान्य जीवन ते जगू शकतात. नातेवाइकांनी ती संधी त्यांना द्यावी. जोगिंदरची कुटुंबीयांशी भेट झाली. आतापर्यंत देशभरातील अनेक बरे झालेल्या मनोरुग्णांची नातेवाइकांशी भेट घडवून आणली आहे. बरे झालेल्या मनोरुग्णांना स्वीकारल्यास मनोरुग्णालयाचे काम सोपे होईल.
- डॉ. फारुखी, वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णालय, नागपूर.

आईच्या डोळ्यांत महापूर
जोगिंदरला बघताच आईला डोळ्यांत महापूर आला. जोगिंदरही मनसोक्त रडला. आईने लेकराच्या पाठीवरून हात फिरवला. आईसोबत जोगिंदरचे इतरही नातेवाईक होते. घरी जाताना जोगिंदरने सामाजिक कार्यकर्ते, डॉक्‍टर, परिचारिका अटेंडंट यांच्याकडे बघितले. साऱ्यांचेच डोळे पाणावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com