फेसबुकमुळे हिराबाईला दिसला मुलांचा चेहरा

संजीव निकम
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नांदगाव - सोशल मीडियाची ताकद किती प्रभावी असू शकते, याची प्रचीती आज पुन्हा आली. ‘फेसबुक’वरच्या मित्राने नजरचुकीने परराज्यात आलेल्या एका असहाय मातेची कहाणी पोस्ट केली अन्‌ ती पोस्ट बघून एका असहाय मातेच्या मदतीला पुण्यातील योगेश मालखरे व त्यांची स्माइल प्लस सोशल फाउंडेशन धावून आली. गाव, घरापासून पोरक्‍या झालेल्या असहाय मातेसाठी जवळपास १५०० किलोमीटरचा प्रवास करून तिला पुन्हा नांदगावला आणून मुलांची गाठभेट घालून देण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या या संस्थेची कहाणी... 

नांदगाव तालुक्‍यातील मांडवड येथील हिराबाई उत्तम थेटे (वय ५५) घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्या. त्यांच्या मुलांनी आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण थांगपत्ताच लागेना. मांडवडमधून अशाच एके दिवशी हिराबाई घराबाहेर पडल्या अन्‌ रेल्वेत जाऊन बसल्या. कुठल्या गाडीत त्या बसल्या अन्‌ कुठे जातेय याचा त्यांना उमजच पडला नाही. मुंबईहून निघालेल्या रेल्वे एक्‍स्प्रेसमधून त्यांच्या या प्रवासात ना टीसीने अडविले, ना रेल्वे पोलिसांनी. झारखंड जिल्ह्यातील बेरमो बगारोमध्ये त्या उतरली. कोळशाच्या खाणीच्या या परिसरात मग त्यांची भटकंती सुरू झाली. एक असहाय महिला वेड्यासारखी भटकतेय म्हणून काहींनी दुर्लक्ष केले. मात्र, एका मुस्लिम कुटुंबीयाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्यांना आधार दिला. त्यांना मराठीशिवाय दुसरे काही बोलता येत नव्हते. संवाद साधणाऱ्या व सहानुभूती भाषेचा अडथळा येत होता. त्याच कोळसा खाणी परिसरात सुरक्षा दलाचे जवान आर. के. दुर्गाई यांनी हिराबाईंना बघितले.

दुर्गाई जळगावचे. त्यांनी मराठीतून विचारपूस केली. त्यांनी या महिलेची माहिती झारखंड मुक्ती मोर्चाचे युवा नेता अमित कश्‍यप यांना देत मदतीसाठी आवाहन केले. दुर्गाई व कश्‍यप यांनी त्यांचा फोटो ‘फेसबुक’वर शेअर्स केला अन्‌ हे सर्व बघून धावून आले ते पुण्याचे योगेश मालखरे. त्यांनी आतापावेतो साडेतीनशेच्या आसपास भरकटलेल्या वेडसरांना आपल्या घरी पोचवले आहे. पुण्याहून त्यांनी आपल्या स्माइल प्लस सोशल संस्थेतील विशाल चव्हाण, पवार, हेमंत ठाकरे या मित्रांना घेऊन थेट झारखंड गाठले. तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी वाट चुकलेल्या या आईला आपल्यासोबत घेतले. तीन दिवसांचा प्रवास करून आज दुपारी त्यांनी नांदगाव गाठले. नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या कार्यालयात हिराबाईंची व त्यांच्या मुलांची भेट झाली. सहा महिन्यांनंतर झालेल्या आईची आणि मुलांची भेट भारावून टाकणारी होती.