एकमेकांमधल्या संवादासाठी तरुणाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

‘बाप्पाची पत्रपेटी’ हा उपक्रम सुरू करून एक महिना झाला. या कालावधीत आम्ही जवळपास २२ ते २५ जणांच्या मनास स्पर्श करू शकलो. एकाला मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशन सुरू केले आहे. लोकं स्वतःहून दूरध्वनी करून समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. समुपदेशन करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. आगामी काळात अशी पत्रपेटी शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी बसविण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाद्वारे नैराश्‍य कमी करता येईल, असा विश्‍वास वाटतो. 
- नीलेश गावडे

नाशिक - सोशल मीडियाने माणसावरच आक्रमण करावे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याच्या अतिवापराने एकमेकांमधला संवादच कमी झाला आहे. त्यामुळे समाजात नैराश्‍याचे प्रमाण वाढून त्यातून अनेक आत्महत्याही घडत आहेत. अनेक गोष्टी मनात दडवून ठेवल्याने असे नैराश्‍य येते. आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने सांगाव्यात, नैराश्‍य कमी व्हावे, याच उद्देशातून नीलेश गावडे या तरुणाने ‘बाप्पाची पत्रपेटी’ हा पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले-मुली आजकाल क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करताहेत. एकमेकांचे कौतुक करण्यापेक्षा ‘फेसबुक’वरचे लाइक्‍स महत्त्वाचे वाटायला लागलेत. मुले व्हर्च्युअल जगात जास्त जगायला लागली. मन मोकळे करण्यासाठी कुटुंबापेक्षा, मित्रांपेक्षा सोशल मीडिया जास्त जवळचा वाटू लागला. यातून संवाद कमी झाला. भेटून मनातील भावना, त्रास, दुःख नीट व्यक्त न करता आल्याने तरुण पिढी नैराश्‍येत जाऊ लागली. कालांतराने त्याची परिणती आत्महत्येत व्हायला लागली. कोणालाच सांगणे जमत नसेल, कुठे मन मोकळे करावे कळत नसेल, तर सरळ बाप्पालाच पत्र लिहून सांगितले तर? या विचारातून ‘बाप्पाची पत्रपेटी (बाप्पास पत्र)’ ही संकल्पना सुरू केली.  

‘बाप्पाची पत्रपेटी’ या उपक्रमात मनातील वाईट विचार कागदावर लिहून तो या पेटीत टाकावा. मनातले वाईट विचार, कटू आठवणी, त्रास, राग, वैताग जर बाप्पाला पत्र लिहून व्यक्त केला, तर मन हलकं व्हायला मदत होईल. या पेट्या मंदिरे, वाचनालये, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालये, कंपन्या अशा ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. आलेल्या पत्रांवर अनेकदा नावेही नसतात. त्या पत्रांचे विश्‍लेषण करून काहींना समुपदेशनही उपलब्ध करून दिले जाते. त्याची गोपनीयताही पाळली जाते. यापैकी जर कुणाला मानसोपचार तज्ज्ञांची मदत हवी असेल, तर त्यांना ती पुरवलीही जाते. मानसिक आधार कसा देता येईल, हे पाहिले जाते. समुपदेशक सुनीता सामंत व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जैन हेही या उपक्रमात सेवा देत आहेत. 

आतापर्यंत ही पेटी दत्तमंदिर, राजीवनगर, अनिश फार्मा, अंबड, सिद्धेश्‍वर मंदिर, पाटीलनगर, तसेच ओवी पुस्तकालय, गंजमाळ येथे बसविण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत २० पेट्या बसविण्याचे नियोजन आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुख्य पोस्ट कार्यालयात ‘पोस्ट बॉक्‍स नं. २१’ उपलब्ध करून देण्यात आला आहे.