अपयशाचे रूपांतर यशात करून तो पोचला स्वित्झर्लंडला!

Omkar-Swamy
Omkar-Swamy

साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्रातून निवड झाली आहे. 

ओमकार हा साकोळ येथील कीर्तनकार विवेकानंद बंडप्पा स्वामी (कमठाने) यांचा मुलगा. ओमकारचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साकोळलाच झाले. पण तो दहावीला नापास झाला. अपयशाने तो निराश झाला. पण खचला नाही. नव्या ऊर्मीने तो परत उभा ठाकला आणि धावण्याच्या सरावाला लागला. परत दहावीची परीक्षा दिली व यावेळी त्याला यश मिळाले. दहावी पास झाल्यानंतर ओमकारने लातूर येथील जय क्रांती महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्याने धावण्याच्या सरावाला सुरवात केली. सध्या तो शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले आहे. औरंगाबाद येथे झालेल्या २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले, २०१७ मध्ये चेन्नई येथे झालेल्या नॅशनल चेन्नई चॅम्पियनशिप मॅरेथॉन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला व चेन्नई स्पोर्ट असोसिएशनतर्फे बेस्ट रनर ॲवॉर्ड मिळविला. सिमला येथे झालेल्या २१ किमी मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक पटकावला व मुंबई येथे झालेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या दहामध्ये प्रवेश मिळवला. धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण पतियाळा येथील सुभाष नॅशनल ॲकॅडमीमध्ये घेतले.

देशाचे नाव उंचावणार - ओमकार
महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी असलेल्या बसवकल्याण ते साकोळ हे सत्तर किलोमीटरचे अंतर ओमकारने केवळ सहा तासांत धावून पूर्ण केले. त्याने पहाटे चार वाजता साकोळ येथून धावण्यास सुरवात केली व दहा वाजता तो बसवकल्याण येथे पोहचला. सरावाबाबत ओमकारला विचारले असता तो म्हणाला की, ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळावी व तेसुद्धा अशा स्पर्धेसाठी तयार व्हावेत म्हणून मी हे सत्तर किलोमीटरचे अंतर केवळ सहा तासांत पूर्ण केले आहे. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेसाठी नुकताच ओमकार दिल्लीहून दुबईमार्गे स्वित्झर्लंडला रवाना झाला. स्पर्धेमध्ये निश्‍चितच भारताचा झेंडा रोवू, असा त्याला विश्‍वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com