केळी वेफर्स विक्रीतून बेरोजगारीवर मात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पाचोरा तालुक्‍यातील करंगीच्या भोई दांपत्याच्या भटकंतीला नाशिकमध्ये यश

पाचोरा तालुक्‍यातील करंगीच्या भोई दांपत्याच्या भटकंतीला नाशिकमध्ये यश
नाशिक - पोटाची खळगी भरण्यासाठी जळगावहून नाशिक गाठलेले व मूळचे शेतमजूर असलेले भोई दांपत्य रस्त्यावर केळीच्या वेफर्सचे दुकान थाटत रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवत आहे. मुलाबाळांनी उच्च शिक्षित होऊन चांगले दिवस आणावेत, या अपेक्षेने जीवाचे रान करताय. दोन-पाच किलो वेफर्सची विक्री ते दोन ते तीन क्‍विंटल वेफर विक्रीपर्यंतचा भोई दांपत्याचा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी असाच आहे.

आशाबाई भोई व चतुर भोई हे दांपत्य मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्‍यामधील करंगी येथील. चार वर्षांपूर्वी रोजीरोटीसाठी त्यांनी नाशिक गाठले. पेरूचे बाग काढण्याचे काम हे दांपत्य करते.

उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागेत काम नसते. मुलगा राहुल विज्ञान शाखेत तृतीय वर्षाला; तर मुलगी पूनम बारावीत शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलविण्यासह कुटुंबाचा खर्च
भागविण्याचे आव्हान या दांपत्यापुढे होते. हातात भांडवल नसल्याने व्यवसाय काय करायचा, असा प्रश्‍न होताच; पण "इच्छा असेल तर मार्ग दिसेल' ही म्हण या दांपत्यासाठी तंतोतंत खरी ठरली. दीड वर्षापूर्वी मलमलाबादकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांनी केळीपासून वेफर्स बनवायला सुरवात केली. हिंमत न हारता, व्यवसायात कष्ट घेऊन त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. जिद्द, सचोटीच्या जोडीला अथक परिश्रमांचे फलीत म्हणून हंगामी कालावधीत आता हे दांपत्य तब्बल दोन ते तीन क्विंटल वेफर्सची विक्री करत आहे.

मेहनतीला लेकरांचे लाभतेय बळ
आई-वडील करत असलेल्या मेहनतीतून मुलगा-मुलगीदेखील प्रेरित झाले आहेत. एरवी सुट्यांच्या काळात किंवा वेळ मिळेल तेव्हा त्यांची मुलं व्यवसायाच्या ठिकाणी आई-वडिलांना त्यांच्या कामात आवर्जून हातभार लावतात. वेफर्स बनविण्यासाठी मदत करतात. कष्टकरी भोई दांपत्याच्या मेहनतीला त्यांच्या लेकरांचेही बळ लाभत आहे.

आम्ही नाशिकला आलो, तेव्हा आमच्याकडे फार काही नव्हते. उन्हाळ्यात मजुरीचे काम नसल्याने व्यवसाय करण्याची संकल्पना आम्हाला सुचली. घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असून, व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मुलांनी खूप शिकून मोठे व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
- चतुर भोई

Web Title: Overcome unemployment by banana wafers sailing