‘आयटी’ क्षेत्रातील नोकरी सोडून तरुणाने घेतले २५ मुलांना दत्तक

‘आयटी’ क्षेत्रातील नोकरी सोडून तरुणाने घेतले २५ मुलांना दत्तक

पुणे जिल्ह्यात आळंदी मार्गावर असलेल्या भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीतील पत्र्यांच्या पाच खोल्यांत वसलेलं स्नेहवन म्हणजे अशोक देशमाने या युवकाच्या स्वप्नातील बाबा आमटे यांचे जणू आनंदवनच झाले आहे. मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांची दत्तक घेतलेली २५ मुले येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत. विशेष म्हणजे डॉ. विकास आमटे आणि मंदाताई आमटे यांच्याकडून अशोकला सातत्याने मार्गदर्शन मिळते आहे. 

घरचा कष्टाळू संसार  
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त मंगरूळ गावात सुमारे ४० वर्षांपासून शेतीत काबाडकष्ट करणारा अशोक देशमाने परिवार आज गावचे भूषण बनू पाहतोय. त्याला कारणही तसेच आहे. वडील बाबाराव, आई सौ. सत्यभामा, अशोक आणि दोन बहिणी असा हा परिवार. पाच एकरातून संसार चालविण्यासाठी आईवडिलांची रोजची लढाई होती. कापूस हे त्यांचं मुख्य पीक. शेतीतल्या ताणांपासून काही काळ मुक्ती मिळावी म्हणून वडील भजनकीर्तनात दंग होत. अशोक गावात सातवी शिकला. दहावीसाठी सात किलोमीटरवरील शाळेत जाताना कधी सायकल तर कधी जीपला लटकून जाण्याचेही प्रसंग येत. 
  
डोळ्यांसमोर गावाचंच हीत 
कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या अशोकने जिद्दीने संगणकीय क्षेत्रातून ‘एमएस्सी’ची पदव्युत्तर पदवी २०१२ मध्ये घेतली. त्यानंतर हैदराबादमध्ये सहा महिने संगणक क्षेत्रातील ‘ग्लोबल सर्टीफिकेशन’चा जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर संगणकीय क्षेत्रातील पुण्यातील नामांकित कंपनीत त्याला नोकरीही मिळाली. अशोक सांगतो की ‘आयटी’ क्षेत्रात शहरात नोकरी करायचो, पण डोळ्यासमोर गाव, तिथली माती, शेती, शेतकऱ्यांची मुलं होती. कवितेचा छंद होता. त्यातून शेतीचं दुःख मांडायचो. एकदा आमटे परिवाराचे विचार ऐकल्यानंतरच पुण्यातच भटक्या विमुक्तांच्या झोपड्यांमध्ये जाऊन काही मुलांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. पगारातील दहा टक्के रक्कम त्यावर खर्च करू लागलो. पुढे मुले पालकांबरोबर स्थलांतरीत झाली. काम बंद पडले. त्यानंतर विकास आमटे यांची भेट घेत अडीच तास चर्चा केली. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कायमस्वरूपी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. अशोक अभिमानाने सांगत होता. 

‘स्नेहवन’ सांभाळण्याचे व्रत  
स्वीकारलेले व्रत सोपे नव्हते याची अशोकला जाणीव होती. रात्रपाळीत कंपनीची नोकरी सांभाळून तो मराठवाड्यात बीड, परभणी, वाशिम, जालना आदी भागात फिरायचा. तेथे आत्महत्याग्रस्त किंवा कर्जबाजारी किंवा ऊसतोड वा मजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलांचा शोध घ्यायचा. आई किंवा वडिलांच्या अपघाती मृत्यू झाला आहे असेही घर तो पाहायचा. अशातूनच मग मुलं निवडण्यात आली. आज अशाच घरांतील २५ मुलांना दत्तक घेत त्यांच्यासाठी भोसरी येथे अशोकनं स्नेहवन सुरू केलं आहे. याच नावानं संस्थेचं नोंदणीकरणही केलं आहे. अर्थात हे सगळं करायला नोकरी सोडणे आवश्यक होते. साधारण आॅगस्ट २०१६ ची ही गोष्ट. कंपनीला तसा निर्णय कळविल्यानंतर तिथले अधिकारीदेखील चक्रावून गेले. पण घेतलेले व्रत आता सोडायचे नव्हते. 

जीवनसाथीही मिळाला व्रतस्थ  
एकीकडे नोकरी सोडली असताना दुसऱ्या बाजूला अशोकचे आई-वडील घरी सून आणण्याच्या तयारीत होते. शेतकरी सुनील काठोळे हे देशमाने परिवाराच्या नात्यातले होते. त्यांच्या अर्चना या मुलीचं स्थळ सांगून आलं होतं. हाती नोकरी नाही आणि डोक्यात तर ''स्नेहवन'' घडवण्याचे स्वप्न. ही सर्व स्थिती अशोकने अर्चनाला समजावून सांगितली. मी ‘आयटी’ कंपनीत नोकरीत होतो. पण आता फकीर झालो आहे. पंचवीस मुलांचा बाप बनलो आहे. तुलाही २५ मुलांची आई व्हावे लागेल. सुखी संसाराच्या जगाच्या व्याख्येत आपल्याला जगता येणार नाही असे सांगून तिला भावी आयुष्याची कल्पना दिली. आजच्या जमान्यातल्या मुलींनी हे एेकून नकारच दिला असता. पण पदवीधर अर्चना देखील मनाची मोठी. सारी वस्तुस्थिती स्वीकारून तिने जीवनसाथी होण्यास होकार भरला. अन त्यानंतर चारच दिवसांनी शुभमंगल झाले. हुंडादेखील नाकारला असे अशोक नम्रपणे सांगतो. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पाच खोल्यांच्या पत्र्याच्या घरात म्हणजे स्नेहवनमध्ये अशोक, अर्चना व दत्तक घेतलेली २५ मुले असा संसार सुरू झाला. 

आई-वडिलांची समर्थ साथ 
नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेण्याच्या संकल्पनेला अशोकच्या आई-वडिलांनी आधी विरोध केला होता. मात्र आपल्या मुलाची धडपड, उद्दिष्ट, शेतकऱ्यांच्या मुलांविषयी त्याला असलेली कणव या गोष्टी पाहाता त्यांनीही मुलाला या प्रवासात साथ करायचे ठरवले. आपले गाव सोडून ते आता मुलासोबत राहतात. अशोकची आई व अर्चना मुलांचा स्वयंपाक, धुणी-भांडी करतात. अशोकचे वडील वारकरी संप्रदायातील असून त्यांनी मुलांना मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

असे साकारले स्नेहवन 
स्नेहवन साकारताना सुरवातीला मोठी अडचण होती ती भांडवलाची. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपक्रम सुरू करायचा आहे असे सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल कोठे यांनी आपले पाच खोल्यांचे घर मोफत उपलब्ध केले. त्याचबरोबर नोकरीत जमा केलेली दोन लाखांची पुंजीही अशोकने उपयोगात आणली. राहुल देशपांडे, सच्चिदानंद कुलकर्णी, अवधुत खरमाळे, नितीन जिरासे, बडोद्याचे निकीतीन काॅन्ट्रॅक्टर, कविता मरूडकर यांनी आपल्या परीने सर्व मदत केल्यामुळे स्नेहवन उभे राहिले.

स्नेहवनातून शिक्षणाचा मार्ग  
आसपासच्या झोपड्यांमधील पंधरा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही त्याने स्वीकारली आहे. कागद-कचरा गोळा करणाऱ्या या मुलींना स्नेहवनमुळे शिक्षणाचा मार्ग सापडला. आज अशोक व अर्चना यांच्या रूपाने या सर्व मुलांना आपले आई-बाबा मिळाले आहेत.  

प्रतिभेचा आविष्कार 
स्नेहवनमधील मुलांच्या प्रतिभेचे दर्शनही पाहण्यास मिळते. सातवीत जाणारा ओंकार उत्तम ‘कुक’ आहे. तो काही लोकांचा स्वयंपाक जलद बनवू शकतो. चौथीत शिकणारा लखन खणखणीत गाणे गातो. पस्तीसपर्यंत पाढे म्हणतो. नववीतला श्रीकांत वाचनवेडा आहे. त्याने मृत्युंजयकार शिवाजी सावंत, अभय बंग, सुधा मूर्ती अशा मान्यवरांची पुस्तके वाचली आहेत. पहिलीतला प्रसाद उत्तम सूर्यनमस्कार घालतो. कविता, अभंग देखील सादर करतो. 

हजार पुस्तकांचं वाचनालय 
स्नेहवनमध्ये एक हजार पुस्तकांचं वाचनालय तयार केले आहे. ‘वन बुक वन मूव्ही’ अशी संकल्पना राबवली जाते. मुलांनी कोणत्याही विषयावरचे पुस्तक वाचावे आणि आठवड्यातून एकदाच आवडीचा सिनेमा पाहावा अशी ती संकल्पना आहे. भरपूर खेळ, अभ्यास, मूल्यशिक्षणावर भर अधिक दिला जातो असे अशोकने सांगितले.    

गावची नाळ तुटू देऊ नये 
शेतीत असंख्य समस्यांनी घेरलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मी दत्तक घेतले आहे. या मुलांनी चांगल्या प्रकारे विकसित होऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्यावी, आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, असे अशोकला वाटते. आपल्या स्नेहवन उभारणीमागचं तत्त्वज्ञान सांगताना अशोक म्हणतो की, या मुलांनी खूप मोठे व्हावे. त्यांचा एक हात संगणकाच्या माऊसवर तर दुसरा शेतीत असावा. त्यांची गावाशी नाळ तुटू नये. इथे भारत विरुद्ध इंडियाचा मोठा संघर्ष आहे. गेल्या पंधरा वर्षांत सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही ‘आयटी’ क्षेत्रातील मुले एका पार्टीत १० ते २० हजार रुपये उधळतत. आणि तिकडे तेवढेच पैसे कमी पडले म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. माझं स्नेहवन म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथेवर माझ्यासारख्या शेतकऱ्याच्याच मुलाने घातलेली फुंकर आहे. जिवात जीव असेपर्यंत ती मी हळुवारपणानं फुंकत राहीन!

अशा आहेत सुविधा 
स्नेहवनची मुले शेजारील समता विद्यालयात शिकतात. सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार, अभ्यास झाल्यावर मुले शाळेत जातात. सायंकाळी पुन्हा खेळ, अभ्यास, प्रार्थना या गोष्टी होतात. मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी खेळ खेळला जातो. यात रिंगण करून त्यात मुलगा बसतो. यात कोणत्याही एका विषयावर त्याला बोलायची संधी दिली जाते. पारंपरिक खेळ, भजन, तबला, हार्मोनियम, कराटे, पेंटिंग,ध्यान, मूल्यशिक्षण, संगणकाचे धडेही दिले जातात. शेतीशाळाही सुरू करण्याचा मानस असून केवळ जागेचा प्रश्न आहे. समस्या खूप असूनही तोडगा काढत स्नेहवनचा मोठा परिवार आज सुखासमाधानाने एकत्र जीवन  जगतो आहे.  

सामाजिक कुटुंब 
स्नेहवनमध्ये अशोकच्या परिवाराचा स्वतंत्र स्वयंपाक नसतो. सर्वजण एकत्र जेवतात, राहतात व एकत्रच झोपतात. अशोकने सामाजिक कुटुंबाची संकल्पना स्वीकारली आहे. माझे स्वतःचे मूलदेखील याच दत्तक मुलांमध्ये मोठे होईल. आम्ही पती-पत्नी मिळून तसा संकल्प केला आहे, असे अशोक सांगतो, त्यावेळी आपण स्तंभित झाल्याशिवाय राहात नाही. 
 : अशोक देशमाने, ८७९६४ ००४८४, 
स्नेहवन, हनुमान कॉलनी,  हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत भोसरी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com