मिरवणुकीने जुळ्या मुलींच्या जन्माचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पाथरूड - समाजात एकीकडे स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना येथील पवार कुटुंबीयांनी जुळ्या मुलींच्या जन्माचे स्वागत गावात मिरवणूक काढून जल्लोषात केले. या मुलींचा नामकरण सोहळाही गुरुवारी (ता.२९) जल्लोषात करण्यात आला. 

पाथरूड - समाजात एकीकडे स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना येथील पवार कुटुंबीयांनी जुळ्या मुलींच्या जन्माचे स्वागत गावात मिरवणूक काढून जल्लोषात केले. या मुलींचा नामकरण सोहळाही गुरुवारी (ता.२९) जल्लोषात करण्यात आला. 

पाथरूड येथील ॲड. विलास अण्णासाहेब पवार यांना एक मुलगी, तर त्यांचे थोरले बंधू हरिदास पवार यांना दोन मुली आहेत. त्यांच्या कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी जन्म घेतलेल्या जुळ्या मुलींचेही गुरुवारी दुपारी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून जल्लोषात गृहप्रवेश करण्यात आला. त्यानंतर अनेक सेवाभावी संस्थेच्या महिलांनी स्त्री जन्माचे प्रबोधन केले. सायंकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात गावातील शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये या जुळ्या मुलींचे नामकरण करण्यात आले.

पवार कुटुंबात पाच मुली असूनही त्यांचा नामकरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी दोन मुली असलेल्या गावातील पंधरा दांपत्यांचा व त्यांच्या मुलींचा शाल, श्रीफळ देऊन रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रात्री आठ वाजता स्त्री जन्माचे अनोखे स्वागत म्हणून ढोक महाराज यांचे कीर्तन करण्यात आले होते. 

स्त्री जन्माच्या स्वागतासाठी व तिचे आत्मबल वाढविण्यासाठी आमदार राहुल मोटे, आमदार प्रा. तानाजी सावंत, भूम नगरपालिकेचे गटनेते संजय गाढवे, यशस्विनी महिला बचत गटाच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे, भूम नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता बोराडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश कांबळे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय बोराडे, ग्रामपंचायतीचे सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्यासह परिसरातील महिला, शालेय विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: pathrud marathwada news twins girl birth celebration