स्वकमाईतून उजळवली अनाथांची दिवाळी

स्वकमाईतून उजळवली अनाथांची दिवाळी

हिंजवडी - आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवितात. आयटीयन्सकडूनही अशा समाजोपयोगी उपक्रमांना वाखाणण्याजोगा प्रतिसाद मिळतो; पण काही आयटीयन्स आपल्या कमाईपेक्षा खऱ्या कमाईतून अनाथांची दिवाळी शुभ्र करत असतील तर...दिवाळीत पणत्या विकून ही कमाई अनाथ आश्रमातील मुलांसाठी सत्कारणी लावून एक वेगळा आदर्श काही आयटीयन्सनी निर्माण केला आहे. एक भावस्पर्शी अनुभव या मुलांना यातून मिळाला आहे.

शिवांजली हेल्पिंग हॅन्डस्‌ ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या आयटी कंपनीत काम करणारे तब्बल अठरा ते वीस तरुण यासाठी एकत्र आले. गेल्या सहा वर्षांपासून हे सर्व जण अनेक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी रुपीनगरमधील किनारा वृद्धाश्रम, लोणावळ्यातील संपर्क बाल आशाघर व केंदूर येथील माहेर या संस्थांना मदत केली आहे. मात्र, या दिवाळीत त्यांनी वेगळे काहीतरी करू म्हणून एक उपक्रम हाती घेतला. चिखलीतील विकास अनाथ आश्रमातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, झोपण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी ठरविले. 

कंपनीतून सुटल्यानंतर फावल्या वेळात पणत्या रंगवून त्यावर नक्षीकाम करण्याचे काम त्यांनी दिवाळीपूर्वी पूर्ण केले. त्यानंतर दिवाळीची व वीकेंडच्या सुटीत त्यांनी शहरातील निगडी प्राधिकरण, पिंपळे सौदागर, बाणेर, वाकड या भागांत पणत्यांचे स्टॉल लावले.

खरेतर आयटीतील नोकरीत ऐटीत राहण्याची ऐपत असताना त्यांनी दिवाळीची सबंध सुटी त्यांनी या विक्रीच्या कामातच घालवली. पणत्या विक्रीतून त्यांनी दोन लाख सत्तर हजार रुपये मिळाले. ही रक्कम त्यांनी आश्रमातील ४१ मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी संस्थाचालक माऊली हरकळ यांच्याकडे सुपूर्त केले. 

गुरुकुल सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीतील सागर मिसाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे सहकारी सूरज ससार, कानिफ फत्तेपूरकर, स्नेहल मिसाळ, शबाना सय्यद यांनीही या उपक्रमात हिरिरीने सहभाग घेत रस्त्यावर चौकाचौकात बसून पणत्या विक्री अभियान राबविले. या कामात अद्वैत क्षीरसागर, आकाश पाटील, विधी गुप्ता, साक्षी कुलोली, नेहा हिरेमठ, वृद्धी सोनकर, ईवी थॉमस, आर्यन पाटील, अवनिश मंगेश ढोरे यांची मोलाची साथ मिळाली. 

त्यासोबत या आश्रमातील दुरवस्थेबाबत त्यांनी बांधकाम व्यावसायिक अमोल म्हस्के यांच्याकडे व्यथा मांडली. म्हस्के यांनीही आश्रमात फरशी बसवण्याचे काम पूर्ण करून दिले. सिनेअभिनेत्री सिद्धी राऊत यांनी या मुलांसाठी फराळ दिला. 

या सर्व अभियंत्यांनी घरी दिवाळी साजरी न करता दिवाळीत होणारा खर्च अनाथ मुलांच्या दिवाळीवर खर्च केला. त्या अनाथ मुलांना दिवाळीचा फराळ, मिठाई व कपडे गोळा करून त्यांची दिवाळी साजरी केली. 
सागर मिसाळ, आयटीयन

या अनाथ आश्रमातील मुलांसाठी सत्तर हजार रुपये किमतीचे पलंग बनवण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्या मुलांना कडाक्‍याच्या थंडीत फरशीवर झोपण्याऐवजी पलंगावर झोपविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 
सूरज ससार, आयटीयन

स्वतःसाठी तर सर्वच जगतात. मात्र दुसऱ्यासाठी जगण्यात जो आनंद मिळतो तो सर्वांत मोठा असतो. मी अनाथ म्हणून जगलो. विकास साने यांच्या सहकार्याने हा आश्रम १ जून २०११ रोजी सुरू केला. चांगल्या पगाराची नोकरी सोडली. माझा व्यवसाय सांभाळूनही आश्रमातील मुलांना दररोज किमान १६ तास वेळ देतो. राज्याच्या सर्व भागांतील ३ ते१४ वयोगटातील मुले या आश्रमात आहेत. मात्र सागर मिसाळ त्यांच्या सहकाऱ्यांची आश्रमाचा कायापालट करण्यासाठी सतत धडपड आहे. ते या आश्रमाचाच एक भाग बनले आहेत. 
- माउली हारकळ, संस्थाचालक, विकास अनाथाश्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com