सोमाटण्यात लोकसहभागातून चौपदरी रस्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सोमाटणे - सोमाटणे ग्रामपंचायतीने पदरमोड व लोकसहभागातून गावात जाण्यासाठी चौपदरी रस्ता केला असून, शेतीच्या आठवणीसाठी प्रवेशद्वारावर बैलगाडीची बांधणी केली आहे. मावळातील हा पहिला गावासाठी चौपदरी रस्ता आहे.

सोमाटणे - सोमाटणे ग्रामपंचायतीने पदरमोड व लोकसहभागातून गावात जाण्यासाठी चौपदरी रस्ता केला असून, शेतीच्या आठवणीसाठी प्रवेशद्वारावर बैलगाडीची बांधणी केली आहे. मावळातील हा पहिला गावासाठी चौपदरी रस्ता आहे.

सोमाटणे गावात जाण्यासाठी पूर्वी गावकऱ्यांना खड्डे-दगडगोट्यांतून मार्ग काढत जावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सोमाटणे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. सरपंच नलिनी गायकवाड, उपसरपंच राकेश मुऱ्हे, सदस्या आशा मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, प्राची मुऱ्हे, सुजाता मुऱ्हे, गोकूळ गायकवाड, सुरेखा जगताप, अरुणा माळी, उमेश जव्हेरी आदींसह ग्रामस्थांनी मावळातील सर्वांत सुंदर व चौपदरी रस्त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंबर कसली आहे. त्यांच्या या उपक्रमाला गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली.

दीड कोटी खर्च
लोकसहभाग व ग्रामपंचायतीने पदरमोड करून दीड कोटी रुपये खर्चातून एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. प्रत्येक गावकऱ्याने काम चांगले होण्यासाठी विशेष लक्ष दिले. गावकऱ्यांच्या या प्रयत्नांतून तालुक्‍यातील सर्वांत मोठा व आकर्षक रस्ता ग्रामपंचायतीने चार महिन्यांत तयार केला. गावात जाण्यासाठी दोन पदरी व येण्यासाठी स्वतंत्र दोन पदरी मार्ग करण्यात आला. 

आकर्षक फूलझाडे अन्‌ बैलगाडी
रस्ता दुभाजकात आकर्षक फूलझाडे व पथदिवे बसविले आहेत. गावाची ओळख दिसण्यासाठी रस्त्याची सुरवात आकर्षक कमानीने करण्यात आली असून मावळात लोप पावत चाललेल्या बैलगाडी व शेतीच्या आठवणीसाठी कमानीच्या मध्यभागी आकर्षक भव्य बैलगाडी ओढणारे बैल यांची निर्मिती केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे बांधले असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र पाणी यंत्रणा तयार केली आहे.

मावळातील पहिलाच रस्ता
ग्रामसहभागातून चौपदरी रस्ता हा मावळातला पहिला रस्ता आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, दुभाजकातील फूलझाडे लावणे व पथदिवे बसवण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हा रस्ता दिव्याच्या प्रकाशाने उजळणार असून लवकरच या रस्त्याचे उद्‌घाटनही होणार आहे.